18 March 2019

News Flash

सौरमालेजवळ पंधरा नवीन बाग्रहांचा शोध

यातील एका ग्रहावर पृथ्वीप्रमाणेच द्रवरूपात पाणी असण्याची शक्यता आहे.

टोकियो इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेची घोषणा

टोकियो इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने सौरमालेजवळ पंधरा नवीन बाह्यग्रह सापडल्याची घोषणा केली असून, त्यातील एका ग्रहावर पृथ्वीप्रमाणेच द्रवरूपात पाणी असण्याची शक्यता आहे.

तांबडय़ा लहान बटू ताऱ्यांभोवती हे ग्रह फिरत असून या संशोधनामुळे ग्रहांच्या निर्मिती प्रक्रियेवर नवा प्रकाश पडणार आहे. लालबटू ताऱ्यांपैकी के २-१५५ हा तारा पृथ्वीपासून दोनशे प्रकाशवर्षे दूर आहे. त्याच्या भोवती महापृथ्वीसारखे तीन ग्रह फिरत असून ते पृथ्वीपेक्षा मोठे आहेत. ताऱ्याभोवती सर्वात बाहेरच्या कक्षेत असलेल्या ग्रहाचे नाव के २-१५५डी असे ठेवण्यात आले आहे. तो गोल्डीलॉक झोन म्हणजे वसाहतयोग्य पट्टय़ात आहे. तेरुयुकी हिरानो यांच्या नेतृत्वाखाली  हे संशोधन झाले असून, नासाच्या केप्लर दुर्बिणीने  दुसऱ्या मोहिमेत मिळवलेल्या माहितीच्या आधारे हे पंधरा ग्रह शोधण्यात आले आहेत. या संशोधकांनी स्पेनमधील नॉर्डिक ऑप्टिकल टेलिस्कोप व हवाई येथील सुबारू टेलिस्कोप यांच्या मदतीने पृथ्वीवरून निरीक्षणे केली.

हिरानो यांनी सांगितले, की यातील एक ग्रह वसाहतयोग्य टप्प्यात असून त्रिमिती जागतिक हवामान सादृश्यीकरणाच्या आधारे तेथे द्रवरूपात पाणी असण्याची शक्यता आहे. पण तसे असेलच अशी खात्री देता येत नाही.

के २-१५५ ताऱ्याची त्रिज्या व त्याचे तापमान मोजले तरच तेथील द्रव स्वरूपातील पाण्याची खातरजमा होऊ शकेल. लाल बटू ताऱ्याभोवती फिरणारे हे ग्रह इतर  सौरसदृश ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांपेक्षा लहान असून हे लाल बटू तारे तुलनेने थंड आहेत. त्यामुळे बाह्यग्रह संशोधनासाठी तेच योग्य लक्ष्य म्हणता येतील. ग्रहांची त्रिज्या पृथ्वीच्या दीड ते दोनपट असून पहिल्यांदाच त्रिज्येत फरक दिसून आला आहे. नासाने एप्रिलमध्ये ट्रान्सिटिंग एक्सोप्लॅनेट सव्‍‌र्हे हा टेस नावाचा उपग्रह सोडण्याचे ठरवले आहे. या उपग्रहाच्या मदतीने बाह्यग्रह असलेले संभाव्य उमेदवार ग्रह सापडू शकतील. त्यानंतर पृथ्वीवरून निरीक्षणांच्या मदतीने त्यांची खातरजमाही करता येईल.

First Published on March 14, 2018 3:05 am

Web Title: new planetary discovery near solar series