व्हाईस अॅडमिरल करमबीर सिंह यांच्या नौदल प्रमुखपदावरील नियुक्तीला व्हाईस अॅडमिरल बिमल वर्मा यांनी पुन्हा आव्हान दिले आहे. वर्मा यांनी मिलिट्री ट्रिब्युनलमध्ये नवी याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. संरक्षण मंत्रालयाने व्हाईस अॅडमिरल करमबीर सिंह यांना नौदल प्रमुखपदी नियुक्ती करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी वर्मा यांनी दाखल केलेली याचिका शनिवारी संरक्षण मंत्रालयाने फेटाळली होती.

मिलिट्री ट्रिब्युनलमध्ये आज यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी संरक्षण मंत्रालयाने वर्मा यांची याचिका तत्थ्यहीन असल्याचे सांगत फेटाळली होती. सेवा प्रमुखांच्या नियुक्तीमध्ये सेवा ज्येष्ठता हा प्रमुख निकष असला तरी तो एकमात्र निकष नसल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव ऋचा मिश्रा यांनी स्पष्ट केले होते. तसेच यापूर्वीही करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये सर्व निकषांचा विचार करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.

सरकार आपल्या निर्णयावर समाधानी असल्याचे ऋचा मिश्रा यांनी सांगितले. तसेच व्हाईस अॅडमिरल करमबीर सिंह यांच्या नियुक्तीसाठी सर्व बाबींचा विचार केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ३१ मे रोजी विद्यमान नौदल प्रमुख सुनिल लांबा सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर त्यांच्या जागी व्हाईस अॅडमिरल करमबीर सिंह हे पदभार स्वीकारणार आहेत.

संरक्षण मंत्रालयानेही सर्व बाबींचा विचार करून सिंह यांची नियुक्ती केल्याचे सांगितले. तसेच सरकारने विमल वर्मा यांच्या मेरिटचाही विचार केल्याचे सांगितले. मूल्यांकनानंतर अॅडमिरल वर्मा हे ज्येष्ठ असल्याचे मानले गेले. परंतु नौदल प्रमुखांच्या नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या अन्य निकषांमध्ये ते बसत नसल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली नसल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.