मोटार वाहन कायद्यातील नव्या तरतुदींनुसार केवळ हेल्मेट, वाहन परवाना, सीट बेल्ट किंवा अन्य कागदपत्रांसाठीच भरघोस दंड आकारला जाईल असं नाहीये. तर, व्यावसायिक आणि अवजड वाहनांच्या चालकांनी ठरवलेल्या ‘ड्रेस कोड’चं उल्लंघन केल्यास त्यांनाही भरमसाठ दंड आकारला जाईल. आतापर्यंत हा नियम काटेकोरपणे लागू करण्यात आला नव्हता. आता मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. याची सुरूवात उत्तर प्रदेशातून झाली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ट्रक चालकांना लुंगी नेसून ट्रक चालवणं आता चांगलंच महागात पडतंय. कारण, लुंगी घातल्याने येथील ट्रक चालकांना दंड म्हणून 2000 रुपये द्यावे लागत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, येथे लुंगी नेसून ट्रक चालवणाऱ्यांवर कारवाई करत चालान कापण्यास सुरूवात झाली आहे. याबाबत येथील सहायक पोलिस अधीक्षक(वाहतूक विभाग) पूर्णेंद्रू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकांना फुल पँट, शर्ट किंवा टीशर्ट आणि बूट घालावेच लागतील. नव्या नियमांनुसार, स्कूल बसच्या चालकांनाही ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आलेला आहे. ड्रेस कोडचा नियम 1939 पासून आहे, पण 1989 मध्ये या कायद्यात संशोधन केल्यानंतर 500 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली होती. पण आता नव्या नियमांनुसार दंडाची रक्कम दोन हजार रुपये झाली आहे.

नवीन नियमांनुसार, फुल पँट, शर्ट किंवा टीशर्ट घालूनच आता गाडी चालवावी लागणार आहे. तसंच नव्या नियमांनुसार आता गाडी चालवताना पायात बूट घालणे गरजेचे आहे. चप्पल, सँडल घातलेली असल्यास देखील दंड आकारला जाणार. हा नियम स्कूल बसच्या चालकांनाही लागू झाला आहे. स्कूल बसच्या चालकांनाही ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आलेला आहे. मोटार वाहन कायद्यातील नव्या तरतुदींची अंमलबजावणी सुरू झाली आहे.