देशातील करोनाबाधितांच्या संख्येने बुधवारी ५६ लाखांचा टप्पा ओलांडला. एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी मागील पाच दिवसांमध्ये करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नवाने आढळून येणाऱ्या करोना रुग्णांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच करोनाविरोधातील भारताच्या लढ्याला यश येत असल्याचे चित्र नव्याने करोनाबाधित झालेले रुग्ण आणि करोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीतून दिसत आहे.

बुधवारी देशात ८३ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आल्याने देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५६ लाखांवर पोहोचली. याच वेळी, ८९ हजार कोरनाबाधितांना करोनावर मात केल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. देशामध्ये करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४५ लाखांहून अधिक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८१.२५ टक्के इतके आहे.

शनिवार म्हणजेच १९ सप्टेंबर २०२० पासून सलग पाच दिवस नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. १९ सप्टेंबर रोजी देशामध्ये करोनाचे ९३ हजार ३३७ नवे रुग्ण आढळून आले. तर त्याच दिवशी देशभरातील एकूण ९५ हजार ८८० रुग्ण करोनामुक्त झाले. त्यानंतर २० सप्टेंबर रोजी एकीकडे देशात ९१ हजार ६०५ नवे करोना रुग्ण आढळून आले तर दुसकीकडे ९४ हजार ६१२ रुग्ण करोनामुक्त झाले. सोमवारी देशामध्ये ८६ हजार ९६१ करोना रुग्ण आढळून आले. मात्र त्याच दिवशी ९३ हजार ३३५ रुग्णांनी करोनावर मात केली. म्हणजे तुलनात्मरित्या सोमवारी नव्या करोना रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या ही सात हजारहून अधिक होती. २२ सप्टेंबर रोजी करोनाबाधित रुग्ण आणि करोनामुक्त रुग्णांच्या संख्येतील अंतर २६ हजारहून अधिक होते. मंगळवारी देशात ७५ हजार ८३ नवे करोनाबाधित आढळून आले. तर याच दिवशी पहिल्यांदाच एका दिसवात करोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला. मंगळवारी एक लाख  एक हजार ४६८ जणांनी करोनावर मात केली. बुधवारी म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी देशामध्ये ८९ हजार ७४६ जण करोनामुक्त झाले तर याच दिवशी करोनाचे ८३ हजार ३४७ करोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीमधून समोर आली आहे.

देशामध्ये करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा दर १.५९ टक्क्य़ांपर्यंत कमी झाला आहे. करोनामुळे प्राण गमावावा लागलेल्यांच्या संख्येने बुधवारी ९० हजारांचा टप्पा ओलांडला.