इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या वैज्ञानिकांचा दावा; हवामानाचा ३५ वष्रे अभ्यास करून निष्कर्ष
भारतातील काही ठिकाणी पावसाचे असलेले जास्त प्रमाण हे एल निनो व जागतिक हवामान बदलांपेक्षा स्थानिक तापमान बदलांवर जास्त अवलंबून आहे, असा दावा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या वैज्ञानिकांनी केला आहे. गेल्या पस्तीस वर्षांतील हवामानाचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. शेकडो हवामान केंद्रांवर भारतात तापमान व इतर नोंदींची सोय आहे त्यातील माहिती यात आधारासाठी घेतली होती त्याचे विश्लेषण करून पावसाचे प्रमाण स्थानिक तापमानाशी निगडित असल्याचे सांगण्यात आले. एल निनो सदर्न ऑसिलेशन व जागतिक हवामान बदल यांचा प्रभाव यात फारसा असत नाही, उलट स्थानिक तापमानाचा परिणाम जास्त असतो. एल निनो सदर्न ऑसिलेशन म्हणजे एनएनएसओमुळे पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान वाढते. काही अभ्यासानुसार पॅसिफिकमध्ये एल निनो प्रखर असेल तर भारतातील मान्सूनचा पाऊस चांगला होत नाही. २०१५ मध्ये पाऊस सरासरीइतका पडला नाही त्यावर्षांत एल निनो तीव्र होता.
जर एल निनो पावसावर वर्षभरासाठी परिणाम करू शकतो तर जागतिक हवामान बदल मोसमी पाऊस बदलू शकतात, असेही मानले जाते. संख्याशास्त्रीय पद्धतीने एक्स्ट्रीम व्हॅल्यू थिअरी व जनरलाईज्ड लिनियर मॉडेल्स यांचा विचार केला तर संशोधकांच्या मते स्थानिक व जागतिक घटकांसह विविध हवामान घटक पावसावर परिणाम करीत असतात व हे भारताच्या बाबतीत खरे आहे असा दावा केला आहे. मागील काही वर्षांतील पाऊस व भूमी-सागर तापमान फरक यांचा १९६९-२००५ या काळासाठी तौलनिक अभ्यास केला असता असे दिसून येते की, तापमानातील फरकाचा परिणाम हा तीव्र, जास्त वेळा व जास्त काळ पाऊस अशा तीन घटकांवर होतो. भारतीय हवामान खात्याने गोळा केलेल्या २००० ठिकाणच्या माहिती आधारे अभ्यास केला असता स्थानिक तापमानाशी जास्त पाऊस होण्याचा संबंध असतो. एल निनो किंवा जागतिक तापमान बदल यांचाही संबंध असला तरी तो फार कमी असतो असे आयआयटी मुंबई येथील सहायक प्राध्यापक अर्पिता मोंडाल यांनी सांगितले. मागील अभ्यासापेक्षा वेगळा भाग म्हणजे पावसाची तीव्रता, कालावधी व वारंवारिता यात स्थानिक तापमानाशी निगडित असते. डिवेचा सेंटर फॉर क्लायमटे चेंज या आयआयएससी संस्थेच्या केंद्रात संशोधक म्हणून काम करताना मोंडाल यांनी हा अभ्यास केला होता. अतिपाऊस हा तेव्हाच गणला जातो जेव्हा विशिष्ट मर्यादा ओलांडली जाते. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या काळात कितीवेळा जास्त पाऊस पडतो याला वारंवारिता मानले आहे. लागोपाठ किती दिवस अतिपाऊस पडतो याला कालावधी म्हटले आहे. स्थानिक तापमानात जर बदल झाले तर त्याचा फार मोठा परिणाम अतिपावसाच्या घटनांवर होतो.