पाकिस्तान, चीनकडून होणाऱ्या हॅकिंगच्या घटनांनंतर निर्णय

पाकिस्तान आणि चीनकडून भारतीय सुरक्षा दलांशी संबंधित व्यक्तींचे स्मार्टफोन ‘हॅक’ करून संवेदनशील आणि गोपनीय माहिती मिळवण्याचे प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संरक्षण दले आणि गुप्तवार्ता विभागातील कर्मचाऱ्यांसाठी स्मार्टफोन वापराबाबत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

या नियमांनुसार संरक्षण दले, गुप्तहेर संघटना आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दले यातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्मार्टफोन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. या प्रक्रियेचे व्यवस्थित दस्तावेजीकरण करणे गरजेचे आहे. प्रत्येक स्मार्टफोन कोणत्या कर्मचाऱ्याचा आहे, तो कोणत्या कंपनीचा आहे, त्याची तांत्रिक माहिती, त्याचे प्रमाणीकरण कोणत्या अधिकाऱ्याने केले या सर्व बाबी नेमून दिलेल्या अर्जात नमूद केल्या गेल्या पाहिजेत.

कोणत्याही परिस्थितीत खासगी वापराचे स्मार्टफोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे कार्यालयातील संगणक प्रणालीशी जोडता कामा नयेत. तसेच त्यांच्या बॅटरीचे कार्यालयात चार्जिगही करता कामा नये. कार्यालयीन बैठकांदरम्यान स्मार्टफोनचा वापर करता येणार नाही.

पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्था स्मार्टफोनवर वापरल्या जाणाऱ्या टॉप गन, एमपीजंकी, व्हीडीजंकी, टॉकिंग फ्रॉग यांसारख्या गेमिंग, संगीत आणि करमणूक अ‍ॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून भारतीय सुरक्षा दलांच्या कर्मचाऱ्यांकडून गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हरीभाई पार्थीभाई चौधरी यांनी ३ मे रोजी लोकसभेत माहिती दिली होती. त्या संदर्भात अनेक सायबर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही नवी नियमावली तयार करण्यात आली आहे.

ही अ‍ॅप्स स्मार्टफोनवर डाऊनलोड करून वापरताना संवेदनशील माहिती पाकिस्तान आणि चीनच्या हेरगिरी संस्थांना हस्तांतरित होत होती. त्यामुळे त्यांचा वापर न करण्याच्या सूचना सुरक्षा दले व गुप्तहेर संघटनांतील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सीमा सुरक्षा दलातील जवानांकडून त्यांची छायाचित्रे आणि व्हिडीओ क्लिप्स समाजमाध्यमांवर अपलोड केल्या जाणे हेही सर्वात घातक समजले जात आहे. त्यामुळे अशा सर्व प्रकारांवर र्निबध घातले जात आहेत.