बिहारमध्ये एका ६५ वर्षीय वृद्धेने १४ महिन्यांत आठ मुलींना जन्म दिल्याचे दाखवून त्यापोटी मिळणारी प्रोत्साहनपर रक्कम लाटण्यात आली असल्याचे उजेडात आणणारा नवा घोटाळा समोर आला आहे.

मुलीला जन्म दिल्याबद्दल देण्यात येणारा प्रोत्साहनपर भत्ता लाटण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी हा प्रताप केला असून त्यासाठी नोंदणीमध्ये फेरफार केल्याचे समोर आले आहे. मुसाहारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी उपेंद्र चौधरी यांना संशय आल्याने त्यांनी एफआयआर नोंदविला आणि हा घोटाळा उजेडात आला. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या ६५ वर्षीय महिलेचे नाव लीला देवी असे असून तिने १४ महिन्यांत आठ मुलींना जन्म दिल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्येक मुलीच्या जन्मासाठी देण्यात येणारा १४०० रुपये भत्ता तिच्या खात्यात हस्तांतरितही करण्यात आल्याचे व लाभार्थी महिलेने ती रक्कम काढूनही घेतल्याचे दाखविण्यात आले आहे.