दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका स्टिंग ऑपरेशनने खळबळ उडवून दिली आहे. मुस्लिमांना आम आदमी पक्षाशिवाय अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याचे वादग्रस्त विधान करणारी अरविंद केजरीवाल यांची ध्वनिफित प्रकाशात आली आहे. या विधानामुळे पक्षातील अल्पसंख्याक विभागाने केजरीवालांविरोधात बंड पुकारल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 
काँग्रेस आमदाराला ‘आप’चे मंत्रिपदाचे आमिष?
पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस शाहिद आझाद यांनी हे ऑडिओ स्टिंग जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेला थोपविण्यासाठी आम आदमी पक्षाशिवाय अन्य कोणताही पर्याय मुस्लिमांसमोर नसल्याचे वक्तव्य केजरीवाल यांनी केल्याचे या ध्वनिफितीतून समोर आले आहे. तसेच केजरीवाल पुढे म्हणतात की, आम्हाला आशा आहे की मुस्लिम आमच्या सोबत आहेत. मोदी देशातील प्रत्येक राज्यात एकानंतर एक सत्ता स्थापन करत आहेत. आज मुस्लिम आमच्याकडे पाहत आहेत. जर मोदींना कोणी थांबवू शकत असेल तर फक्त आम आदमी पक्ष.’
दरम्यान, केजरीवालांवर विश्वास ठेवत ‘आप’ च्या मायनॉरीटी सेलने सर्वानुमते २४ नोव्हेंबरला एक प्रस्तावही मंजूर केला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ११ जागा मुसलमान उमेदवारांना देण्याचा हा प्रस्ताव होता. पण तिकीट वाटपाच्यावेळी हा प्रस्ताव डावलला गेला. दिल्ली निवडणुकीत मोदींचा परभाव करण्याचा मुस्लिमांचा उद्देश आहे, निवडणूक जिंकून विधानसभेत जाण्याचा नाही, असा तर्क मांडत त्यावेळी केजरीवाल यांनी प्रस्तावानुसार तिकीट वाटप केलेच नाही, असा आरोप देखील यावेळी शाहिद यांनी केला आहे.