सध्या जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. तसंच यावरील लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. त्यातच या व्हायरची उत्पत्ती चीनमधून झाल्याचा दावाही अनेक देशांकडून करण्यात आला आहे. अशा परिस्थिती चीनमध्ये आणखी एक नवा स्वाईन फ्लू सापडल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. अमेरिकन सायन्स जर्नल PANS मध्ये यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. हा नवा स्वाईन फ्लू २००९ मध्ये जगभरात पसलेल्या H1N1 चाच जेनेटिकल डिसेंडेंट असल्याचं म्हणत तो अधिक गंभीर स्वरूपाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

“नवा स्वाइन फ्लू इतका शक्तिशाली आहे की तो माणसाला आजारी पाडू शकतो. जर कोरोना साथीच्या वेळी नव्या स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरला तर तो गंभीर रुप धारण करेल,” असं चीनमधील अनेक विद्यापीठं आणि चीनच्या सेंटर फॉर डिजिस कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनच्या वैज्ञानिकांकडून सांगण्यात आलं आहे. नव्या स्वाईन फ्लूला जी ४ असं नाव देण्यात आलं आहे. याचा शोध घेण्यासाठी चीनच्या वैज्ञानिकांनी २०११ ते २०१८ या कालावधीत संशोधन केलं. तसंच यादरम्यान १० राज्यांमधील ३० हजार डुकरांच्या नाकातून नमूने घेतले. तसंच या नमून्यांची तपासणीही करण्यात आली.

यावरून चीनमध्ये १७९ प्रकारचे स्वाईन फ्लू असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांमध्ये जी ४ ला वेगळं करण्यात आलं. ज्या डुकरांच्या नाकातून नमूने घेण्यात आले त्यापैकी सर्वाधित डुकरांमध्ये जी ४ स्वाईन फ्लू असल्याचं दिसून आलं. तसंच तो स्वाईन फ्लू या डुकरांमध्ये २०१६ पासून असल्याचंही समोर आलं. यानंतर वैज्ञानिकांनी जी ४ वर संशोधन सुरू केला. त्यानंतर समोर आलेल्या गोष्टींमधून सर्वांनाच धक्का बसला.
दरम्यान, जी ४ हा स्वाईन फ्लू मानवामध्ये वेगानं आणि गंभीरतेनं पसरू शकतो अशी माहिती संशोधनातून पुढे आली. हा व्हायरस मानवी शरीरात अधिक तीव्रतेनं पसरतो. तसंच हा सीजनल फ्लू असल्यामुळे कोणालाही जी ४ स्वाईन फ्लूपासून इम्युनिटी मिळणार नाही. सामान्य फ्लूपासून रक्षण होत असलं तरी जी ४ गंभीर रुप धारण करु शकतो, असंही वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.

डुकरांच्या फार्ममध्ये काम करणाऱ्या १० पैकी एका कामगारामध्ये जी ४ चा संसर्ग झाल्याचं दिसून आल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. तसंच वैज्ञानिकांनी त्यांच्या अँटीबॉडी टेस्ट केल्या. त्यानंतर त्यांना जी ४ चा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. २३० जणांच्या केल्या चाचणीत त्यापैकी ४.४ टक्के लोकांना याचं संक्रमण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या हा व्हायरस मानवामध्ये आला असला तरी तो एकाकडून दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होतो का याची मात्र माहिती मिळालेली नाही. सध्या यावर संशोधन सुरू आहे.

जर हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेला तर याचे परिणाम गंभीर होती. तसंच ज्या लोकांचं काम डुकरांशी निगडित आहे, अशा लोकांना अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं चीनच्या वैज्ञानिकांनी आपल्या अहवालात नमूद केलं आहे.