जगातील वाढत्या लोकसंख्येला यापुढे अन्न पुरणार नाही ही समस्या लक्षात घेऊन वैज्ञानिकांनी जास्त अन्न उत्पादन करण्यासाठी कमी पाण्यात जगू शकतील अशा वनस्पती तयार करण्यासाठी एक नवा जनुक शोधून काढला आहे, तो थर्मोस्टॅटसारखा काम करतो.
दुष्काळातही उत्पन्न देऊ शकतील अशी पिके त्यामुळे तयार करता येणार आहेत. या जनुकाचे नाव ओएससीए १ असे असून त्यामुळे वनस्पतींच्या पेशीतील पारपटलात असे प्रथिन तयार होते जे पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊ शकते व त्यानुसार त्या वनस्पतीतील जैविक यंत्रणांमध्ये तडजोड करून त्या वनस्पतीला जिवंत राहून शिवाय उत्पादन देण्यास मदत करते. थर्मोस्टॅटसारखेच काम हे जनुक करते असे डय़ूक विद्यापीठातील झेन िमग पे यांनी म्हटले आहे.
जगातील वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी दुष्काळातही तग धरून उत्पादन देणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती तयार करणे शक्य आहे व त्या हवामान बदलांनाही तोंड देऊ शकतील.
जगात अनेक देशांमध्ये दुष्काळामुळे पिके हातची जातात त्या समस्येवर यामुळे मात करता येईल. दुष्काळाने कृषी उत्पादन निम्म्यावर येते त्यावर मात करण्यासाठी या तंत्राचा वापर करता येईल.
 हा जनुक अरबीडोपसिस थालियाना या कधीही कुणाच्या खिजगणतीत नसलेल्या वनस्पतीत सापडला असून ही वनस्पती कोबी व कॅनोला वर्गातील आहे. संशोधकांसाठी ही वनस्पती आता प्रयोगशाळेतील गिनिपिग ठरली आहे. तिच्यावर प्रयोग चालू आहेत.
पाण्याची कमतरता असतानाही पिकांचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी हे जनुक असलेल्या वनस्पती यशस्वी ठरू शकतील असे ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहे.