त्वचेला कोणताही स्पर्श न करता ह्रदयविकाराचा संभाव्य धोका सांगू शकणारे उपकरण संशोधकांनी तयार केले असून, ते बाजारात उपलब्ध झाल्यानंतर क्रांती घडणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या उपकरणामध्ये कोडेड हेमोडायनामिक इमेजिंग ही पद्धती वापरण्यात आली आहे.
वेगवेगळ्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील रक्ताचा प्रवाह कसा आहे, याचे निरीक्षण या उपकरणाच्या साह्याने केले जाऊ शकते. यासाठी संबंधित व्यक्तीच्या त्वचेला या उपकरणाचा स्पर्श होण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीला कोणताही त्रास न होता, त्याच्या ह्रदयाशी संबंधित गोष्टींचे मोजमाप केले जाऊ शकते. नवजात अर्भकांना या उपकरणाचा मोठा लाभ होऊ शकतो. एनआयसीयूमध्ये असलेल्या अर्भकांच्या ह्रदयाच्या कार्याचे मोजमाप करण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरू शकणार आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये असलेला रक्तप्रवाह मोजण्याची क्षमता या उपकरणामध्ये असल्याचे कॅनडातील वॉटर्लू विद्यापीठातील पीएच.डीचे स्नातक रॉबर्ट मेलार्ड यांनी सांगितले. शरीराच्या वेगवेगळ्या भागातील रक्तप्रवाहाचे निरीक्षण या उपकरणाच्या साह्याने करता येणार असल्यामुळे शरीरामध्ये नेमक्या काय हालचाली घडता आहेत, हे समजू शकणार आहे, असेही त्यांनी सांगितले.