या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात कुठलीही भाववाढ जाहीर करण्यात आली नसली, तरी येत्या काही दिवसांत जादा सुविधांसह सुरू होणाऱ्या नव्या गाडय़ांमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
रेल्वे लवकरच अधिक प्रवासी सुविधा असलेल्या काही मोजक्या विशेष सेवा सुरू करण्याच्या तयारीत असून त्यासाठी एरवीचे भाडे लागू राहणार नाही, असे रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या योजनेनुसार, ‘हमसफर’, ‘तेजस’ व ‘उत्कृष्ट डबल-डेकर एअर कंडिशन्ड यात्री’ (उदय) अशी नावे असलेल्या नव्या गाडय़ा या वर्षी सुरू होण्याची शक्यता असून त्यांचे भाडे नियमित भाडय़ांपेक्षा १५ ते ३० टक्के अधिक असेल. २०१६-१७ च्या रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या या गाडय़ांचे मार्ग आणि गंतव्य स्थाने निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
रेल्वेने ‘डायनामिक फेअर’ पद्धतीवर आधारित सुविधा गाडय़ा यापूर्वीच सुरू केल्या आहेत. काही मार्गावरील वाढती मागणी पुरी करण्यासाठी या गाडय़ा अधूनमधून चालवण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
‘हमसफर’मधील सर्व डबे एसी थ्री टियरचे असतील, तर ‘तेजस’ गाडय़ा ताशी १३० किलोमीटर वेगाने धावतील. ‘उदय’ या नव्याने डिझाईन करण्यात आलेल्या डबल- डेकर गाडय़ा असून त्यांची प्रवासी क्षमता ४० टक्क्य़ांनी जास्त आहे. या सर्व गाडय़ांच्या विशेषरीत्या तयार केलेल्या डब्यांमध्ये अधिक चांगल्या प्रवासी सुविधा राहणार असल्याने त्यांचे भाडेही जास्त असणार आहे.
रेल्वेने अलीकडेच ‘महामना एक्सप्रेस’ व ‘गतिमान एक्सप्रेस’ या गाडय़ा सुरू केल्या आहेत. सुधारित सुविधा असलेल्या या गाडय़ांचे भाडेही नियमित सेवांपेक्षा जास्त आहे. सेवा अधिक चांगली असेल, तर प्रवासीही जादा पैसे मोजण्यास तयार असतात, असे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले.