उत्तर प्रदेशमधील कासगंजमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बरेलीतील जिल्हाधिकारी राघवेंद्र विक्रम सिंह यांनी फेसबुकद्वारे या घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुस्लीमबहुल विभागात किंवा वस्तीमध्ये रॅली काढणे किंवा पाकविरोधी घोषणा देण्याची पद्धतच झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

बरेलीतील जिल्हाधिकारी राघवेंद्र विक्रमसिंह यांनी फेसबुकवर रविवारी रात्री एक पोस्ट टाकली. यात ते म्हणतात, अजब पद्धत सुरु झाली आहे. मुस्लीमबहुल परिसरात बळजबरीने रॅली काढली जाते. पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या जातात. तिथे राहणारे काय पाकिस्तानी आहेत का? बरेलीतील खैलममध्येही हेच झाले होते. आधी दगडफेक आणि मग खटले, असे त्यांनी म्हटले होते. कासगंजमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पोस्ट शेअर केल्याने पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टवरुन सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. शेवटी राघवेंद्र विक्रमसिंह यांनी पोस्ट एडिट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला विक्रमसिंह यांनी सोमवारी प्रतिक्रिया दिली. ‘सध्या राष्ट्रवादाच्या नावाखाली जे सुरु आहे ते बघून दुःख होते. मनातील हा राग व्यक्त करण्यासाठी पोस्ट टाकली होती, असे त्यांनी सांगितले. पाकविरोधी घोषणा देण्याएवजी चीनविरोधात घोषणा दिल्या पाहिजेत. कारण पाकपेक्षा चीन हा मोठा शत्रू आहे, असे मत त्यांनी अन्य एका पोस्टमध्ये मांडले होते. राघवेंद्र विक्रमसिंह २००५ च्या बॅचमधील अधिकारी आहेत. त्यांना आयएएस पदावर बढती देण्यात आली होती. राघवेंद्र हे सैन्यातून निवृत्त झाल्यावर उत्तर प्रदेशमधील सरकारी नोकरीत रूजू झाले होते. गेल्या वर्षी बरेलीतील खैलममध्ये हिंसाचार झाला होता. मुस्लीमबहुल वस्तीतून जाणाऱ्या यात्रेवरुन हा वाद झाला होता. यात १५ जवान आणि सुमारे २४ जण जखमी झाले होते.