गुजरातमध्ये सत्तारूढ भाजप सरकारसमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. पाटीदार आणि दलित आंदोलनांनतर आता आदिवासी समाज आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. राज्यातील आदिवासी बहुल भागात भिलीस्तान आंदोलन वेग घेत आहे. राज्य सरकारला यापूर्वी पाटीदार आणि दलित आंदोलनाला सामोरे जावे लागले आहे. आदिवासी आंदोलनामागे काही संधीसाधू राजकीय नेत्यांचा हात आहे. ते आपल्या राजकीय स्वार्थासाठी अशा गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत. राज्यातील या बदलत्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष असून आगामी काही दिवसात ते गुजरातला जास्त वेळ देतील अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
पंतप्रधान आपल्या वाढदिवसानिमित्त गुजरातला जाणार आहेत. या दरम्यान ते आदिवासी बहुल परिसरातील दाहोद आणि नवसारी येथे सभा घेतील. गुजरातमध्ये मागील दोन दशकांपेक्षा अधिक काळ भाजप सत्तेवर आहे. परंतु पहिल्यांदाच भाजपला यंदा मोठे राजकीय आव्हान मिळत आहे. पक्षाला नेहमी साथ देणारा पटेल समाज आज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. उनामध्ये दलित युवकांच्या मारहाणीमुळे तर समस्येत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपने सौराष्ट्रला झुकते माप देण्यास सुरूवात केली आहे.
मुख्यमंत्री विजय रूपानी आणि गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष जीतू वाघानी दोघेही सौराष्ट्रचे आहेत. परंतु रूपानी हे जैन समाजाचे आहेत. त्याचबरोबर पटेल समाज नाराज होऊ नये म्हणून नितीन पटेल यांना उपमुख्यमंत्री बनवले. तसेच जीतू वाघानी हेही पटेल समाजाचे आहेत. गेल्यावर्षी या भागात झालेल्या तालुका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. परंतु शहरी भागात भाजपने वर्चस्व राखले होते. यावेळी काँग्रेसनेही अनेक दशकानंतर भाजपसमोर आव्हान उभे केले आहे.
मोदी पंतप्रधान झाल्यापासून गुजरात भाजपसमोरील संकटात वाढ झाली आहे. त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि आम आदमी पक्ष घेताना दिसत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वीच गुजरातचा दौरा केला होता. त्यांनी पाटीदार आंदोलनाचेही समर्थन केले होते.