लघवीच्या तपासणीवर आधारित असलेली स्तनाच्या कर्करोगाची नवीन निदान चाचणी विकसित करण्यात आली असून त्यात मॅमोग्राममध्ये निदान होण्याच्या अगोदर स्तनाचा कर्करोग समजतो व त्याची तीव्रता किती आहे हे समजते असा दावा करण्यात आला आहे. या चाचणीने अवघ्या दहा मिनिटात एखाद्या स्त्रीला स्तनाचा कर्करोग आहे की नाही हे समजते.
मिसुरी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संशोधकांनी ही चाचणी विकसित केली असून त्यात पी-स्कॅन हे उपक रण वापरले जाते. लघवीच्या नमुन्यातील काही मेटॅबोलाइटसची संहती निश्चित करून त्या स्त्रीला स्तनाचा कर्करोग आहे किंवा नाही हे समजते. टेरेडाइन हे मेटॅबोलाइटस नेमके किती प्रमाणात आहे याच्या आधारे हे निदान केले जाते. यातील जैवदर्शके ही मानवी मूत्रात असतात, परंतु त्यांचे प्रमाण खूप जास्त असले तर त्यातून कर्करोगाचे निदान होते.
स्तनाचा कर्करोग जसा वाढत जातो तसे या टेरोडाइनचे प्रमाण मूत्रात वाढत जाते, असे डॉ.यिनफा मा यांनी म्हटले आहे. आतापर्यंत या चाचणीचा प्रयोग मर्यादित प्रमाणात केला असला तरी त्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर करता येऊ शकतो. अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाकडून हे पी-स्कॅन नावाचे उपकरण सर्व क्लिनिकमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्तनाच्या कर्करोगाची ही चाचणी कमी खर्चिक, शरीराला कुठलाही छेद न देता करता येण्यासारखी आहे. एप्रिलमध्ये मा यांनी मर्सी ब्रेस्ट सेंटर व इमर्जन्सी बायोस्क्रीनिंग या दोन संस्थांच्या मदतीने या वैद्यकीय चाचण्या केल्या. मॅमोग्राम चाचणी फार संवेदनशील नसते, काही कर्करोग त्यात कळत नाहीत, पण पी स्कॅन पद्धत वापरली तर आपल्याला कर्करोगाची प्रगतीही समजू शकते. यात रूग्णाचे मूत्र घेतले जाते व दहा मिनिटांत तुम्हाला त्या स्त्रीस स्तनाचा कर्करोग आहे की नाही हे समजते. टेरेडाइन्स हे मेटाबोलाइट लघवीत असतात पण जर तुम्हाला कर्करोग असेल तर त्याचे प्रमाण खूपच वाढलेले दिसते हाच या चाचणीचा आधार आहे. फक्त नेमकी किती पातळी असली तर स्तनाचा कर्करोग आहे असे समजायचे याची निश्चिती अजून व्हायची आहे.