काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी एका ट्विटद्वारे जाहीर केले होते की, ऑक्सफर्डच्या इंग्लिश डिक्शनरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधीत एक नवा शब्द समाविष्ट झाला आहे. या शब्दांची माहिती देताना त्यांनी आपल्या ट्विटमध्ये त्याचा स्क्रिनशॉटही टाकला होता. Modilie (मोदीलाई) हा तो शब्द असून याचा अर्थ जो कायम खऱ्याची मोडतोड करुन जाणूनबुझून खोटं बोलत असतो असा आहे. याचाच अर्थ राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी हे कायम खोटं बोलतात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यावरुन ते आता तोंडघशी पडले आहेत. कारण, त्यांनी या दाव्यासाठी जे स्क्रिनशॉट्स ट्विट केले आहेत ते बनावट असल्याचे समोर आले आहे.


ऑक्सफर्डच्या लिविंग डिक्शनरीमध्ये हा शब्द शोधण्याचा प्रयत्न केल्यास तो शब्द डिक्शनरीत नसल्याचे दिसते. तर दुसरीकडे राहुल गांधींनी ट्विट केलेले स्क्रीनशॉट पाहिले तर त्यामध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीचा लोगो मूळ लोगोपेक्षा वेगळा दिसत आहे. यावरुन हा फोटो बनावट असल्याचे सिद्ध होते.


मात्र, या प्रकारावरुन आता भाजपाने राहुल गांधींनाच निशाणा बनवले आहे. काँग्रेस अध्यक्षच असे खोटे पसरवत आहेत असा आरोप भाजपा नेते खेमा यांनी केला आहे.


राहुल गांधींच्या ट्विटच्या कमेंट सेक्शनमध्ये काँग्रेस आणि भाजपा समर्थकांमध्ये चांगलीच जुंपल्याचेही पहायला मिळते. दरम्यान, एका काँग्रेस समर्थकाने एका वेबसाईटचा उल्लेख करीत या वेबसाईटचे नावही मोदीलाई असल्याचे म्हटले आहे.