बेंगळुरू येथे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेल्या एका युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. गतवर्षीही नवीन वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका युवतीचा विनयभंग करण्यात आला होता. त्याच ठिकाणी काल विनयभंग झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकारामुळे नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला गालबोट लागल्याचे दिसून येते. परंतु, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. मुलीची छेड काढल्याचे सीसीटीव्ही फुटेज नाही किंवा पुरावाही अद्याप मिळालेला नाही. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार एक युवती रडत असल्याचे दिसली होती. गतवर्षी ज्या ठिकाणी युवतीची छेड काढली होती. त्याचठिकाणी कालची घटना घडल्याचे सांगण्यात येते.

महिलेची छेड काढण्यात आल्याची पोलिसांत अद्याप तक्रार आलेली नाही. त्यामुळे या वृत्ताला अजून दुजोरा मिळू शकलेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिगेड रोड आणि एमजी रोडवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आक्षेपार्ह काहीच दिसून आलेले नाही, असे ‘इंडिया टूडे’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला बेंगळुरू पोलिसांनी रविवारी हायअलर्ट जारी केला होता. सुमारे १५ हजार पुरूष व महिला पोलीस बेंगळुरूच्या विविध भागात तैनात करण्यात आले होते. गतवर्षी झालेली घटना यंदा पुन्हा होऊ नये म्हणून पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली होती. गतवर्षी मोठ्याप्रमाणात महिला व मुलींची छेड काढण्यात आली होती. त्यामुळे यंदा पुरेशी काळजी घेण्यात आली होती.

पब, बार, रेस्तराँ आणि रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या मंडळींविरूद्ध कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्याचबरोबर ब्रिगेड रोड आणि एमजी रोडवर अतिरिक्त सीसीटीव्हीही बसवण्यात आले होते. यंदा विविध कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता.

गतवर्षी महिला, मुलींची छेड काढणे, विनयभंग करण्याचे प्रकार घडले होते. एमजी रोड आणि ब्रिगेड रोडवर हा प्रकार जास्त आढळून आला होता. त्यामुळे पोलिसांना जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला होता. दरम्यान, पोलिसांनी असा काही प्रकार घडला नसल्याचे म्हटले होते.