01 March 2021

News Flash

न्यूयॉर्क विधानसभेने ५ फेब्रुवारी ‘काश्मीर अमेरिकन दिवस’ घोषित केला; भारत म्हणाला…

अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यामधील विधानसभेमध्ये संमत झाला प्रस्ताव

प्रातिनिधिक फोटो (मूळ फोटो : रॉयटर्सवरुन साभार)

अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यामधील विधानसभेमध्ये पाकिस्तानचे समर्थन करणारा ठराव संमत करण्यात आला आहे. या ठरावानुसार ५ फेब्रुवारी हा दिवस काश्मीर अमेरिकन दिवस घोषित करण्यात येणार आहे. मात्र या ठरावाविरोधात भारताने कठोर शब्दांमध्ये निषेध नोंदवला आहे. भारताने हा ठराव म्हणजे स्वार्थी हेतूने मांडण्यात आलेला ठराव असल्याचं म्हटलं आहे. तसेच जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून त्याला भारतापासून वेगळं करता येणार नाही. तसेच भारताने न्यूयॉर्क राज्यातील नवनिर्वाचित प्रतिनिधिंशी भारतीय समुदायाशीसंबंधित चर्चा करण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.

न्यूयॉर्क स्टेट असेम्बली म्हणजेच विधानसभेमध्ये पाच फेब्रुवारी हा दिवस काश्मीर अमेरिकन दिवस घोषित करणारा ठराव गव्हर्नर एण्ड्रू कुओमो यांनी संमत केला. पाकिस्तानमध्ये ५ फेब्रुवारी हा दिवस काश्मीर एकदा दिवस म्हणून साजरा करतो. या प्रस्तावावर भारताने कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करत, दोघांमध्ये दुफळी निर्माण करण्याच्या हेतूने जम्मू-काश्मीरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची चुकीची व्याख्या तयार करुन स्वार्थी हेतूने हा ठराव संमत करण्याचा प्रयत्न चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. विधानसभेमधील सदस्य नादर सायेघ आणि अन्य १२ सदस्यांनी हा ठराव मांडला होता.

प्रस्तावात काय नमूद केलं आहे

या प्रस्तावामध्ये काश्मीरी जनतेने अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिलं असल्याचं म्हटलं आहे. काश्मीरमधील लोकांनी दृढ निश्चय दाखवला असून हे लोकं न्यूयॉर्कमधील प्रवासी समुदायातील लोकांसाठी एक आधारस्तंभ आहेत. न्यूयॉर्क राज्याने विविधता, जातीय तसेच धार्मिक ओळख निर्माण करण्यासाठी सर्व काश्मिरी लोकांच्या धार्मिक तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यांबरोबरच मानवाधिकारांचे समर्थन करण्याचा ठराव संमत केला असल्याचं या ठरावात म्हटलं आहे.

भारताने नक्की काय म्हटलं आहे

वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासामधील प्रवक्त्यांनी या ठरावासंदर्भात मतप्रदर्शन करताना न्यूयॉर्कच्या विधानसभेमधील काश्मीरी अणेरिकन दिवसासंदर्भात ठरावाची माहिती मिळाल्याचं सांगितलं. अमेरिकेप्रमाणेच भारत सुद्धा एक जिवंत लोकशाहीचे उदाहरण आहे. येथील १.३५ अब्ज लोक हे विविधता असणाऱ्या लोकशाहीमध्ये राहतात ही गर्वाची गोष्ट आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याला कोणीही भारतापासून वेगळं करु शकत नाही. जम्मू-काश्मीरबरोबरच संपूर्ण भारत हा विविधतेने नटलेला आहे. मात्र जम्मू-काश्मीरच्या संस्कृती आणि सामाजिक एकतेसंदर्भातील व्याख्या आणि संमत करण्यात आलेला ठराव हा चिंतेचा विषय असल्याचं प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

भारत सदस्यांशी करणार चर्चा

भारतीय दूतावासामधील प्रवक्त्यांनी या प्रस्तावासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर तसेच न्यूयॉर्कमधील सर्व भारतीय समुदायाच्यावतीने न्यूयॉर्कमधील विधानसभेच्या सर्व सदस्यांशी भारत चर्चा करणार आहे. तीन फेब्रुवारी रोजी हा प्रस्ताव संमत करण्यात आला असून यामध्ये कुओमो यांनी ५ फेब्रुवारी २०२१ हा दिवस न्यूयॉर्क राज्यामध्ये काश्मीर अमेरिकन दिवस घोषित करण्यात यावा अशी मागणी केलीय.

पाकिस्तानला झाला आनंद

न्यूयॉर्कमधील पाकिस्तानच्या दूतावासाने हा प्रस्ताव संमत करण्यासाठी सायेघ आणि ‘द अमेरिकन पाकिस्तानी अ‍ॅडव्हकसी ग्रुप’चं कौतुक केलं आहे. पाच ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करत जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याच्या भारताच्या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. अनेकदा हे प्रयत्न अयशस्वी ठरले असले तरी पाकिस्तानकडून असे प्रयत्न वारंवार होताना दिसत आहेत. भारताने या पूर्वीच पाकिस्तानला जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 8:10 am

Web Title: new york assembly passes resolution declaring february 5 as kashmir american day scsg 91
Next Stories
1 उत्तराखंडमध्ये प्रलय
2 शेतकऱ्यांशी चर्चेस सरकार तयार- पीयूष गोयल
3 हिमनद्या वितळण्याचा वेग दुप्पट…
Just Now!
X