मुंबईसह ज्याप्रमाणे महाराष्ट्र लॉकडाउनच्या स्थिती आहे आणि सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत, त्याचप्रमाणे न्यू यॉर्कही लॉकडाउन मोडमध्ये गेलं आहे. मित्र-मैत्रिणींबरोबर बागेत भटकण्यापासून ते बास्केट बॉलसारखे खेळ खेळण्यासारख्या सर्व सार्वजनिक गोष्टींवर न्यू यॉर्कमध्ये बंदी घालण्यात आली आहे. करोना व्हायरसला आळा घालण्यासाठी न्यू यॉर्क प्रशासनाने महाराष्ट्राप्रमाणेच अत्यंत कठोर उपाय रविवारपासून योजले आहेत. उपहारगृहे, मॉल, शॉपिंग अशा अनावश्यक गोष्टींवर न्यू यॉर्कमध्येही बंदी घालण्यात आली आहे.

न्यू यॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्युमो यांनी राज्यातील अत्यावश्यक नसलेल्या सर्व व्यवहारांवर बंदी घोषित केली आहे. अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवणाऱ्या क्षेत्रात नसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी घरीच रहावे असे सांगण्यात आले आहे. वैद्यकीय साधनसामग्री व डॉक्टर्स अन्य राज्यांमधून न्यू यॉर्ककडे वळवण्यात यावं असं आवाहन त्यांनी रविवारी केलं आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनीही आपत्कालिन व्यवस्थापन समितीला वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया व न्यू यॉर्क येथे मोबाइल हॉस्पिटल्स उभारण्याचे आदेश दिले आहेत.

करोनाचा परिणाम भारतीय शेअर बाजाराप्रमाणेच अमेरिकी शेअर बाजारावर पडलेला दिसून आला आहे. अमेरिकी शेअर बाजारातील स्टँडर्ड अँड पूर ५०० हा निर्देशांक पाच टक्क्यांनी घसरला तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज १७ टक्क्यांनी कोसळला.  वॉल स्ट्रीटनं २००८ नंतर बघितलेला हा सगळ्यात मोठा उत्पात असल्याचं सांगण्यात येत आहे.

करोनामुळे बाधितांची संख्या जगभरात ३,३५,००० झाली असून आत्तापर्यंत सुमारे १४,६०० जणांनी प्राण गमावले आहेत, असे जोन्स हॉपकिन्स इन्स्टिट्युटनं म्हटलं आहे. तर अमेरिकेमध्येच ३३,००० करोनाबाधित असून ४०० जणांनी प्राण गमावला आहे. जगभरात करोनानं थैमान घातलं असून अद्याप प्रभावी लस नसल्यामुळे रोगाची लागण होऊ न देणे व सोशल डिस्टन्सिंग करणे हाच एक प्रभावी मार्ग आहे. त्यामुळेच न्यू यॉर्कनंही लॉकडाउनचा निर्णय घेतल्याचे बघायला मिळत आहे. त्याशिवाय न्यू यॉर्कमधल्या हॉस्पिट्ल्समधली बेडची संख्या ५० टक्क्यांनी वाढवावी असा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

करोनाग्रस्तांसाठी केलेल्या वॉर्डमध्ये आपत्कालिन स्थिती उद्भवत असून प्रचंड संख्येने रूग्णांच्या व संशयितांच्या भरतीत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रुग्णालयांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जगभरात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असून वैद्यकीय साधन सामग्रीची चणचण भेडसावण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.