दहशतवादाचे कट उलगडण्याच्या उद्देशाने आजूबाजूच्या मुस्लीम वस्त्यांमध्ये पाळत ठेवणारी पथके विसर्जित करून त्यांची फेररचना करण्याचा निर्णय न्यूयॉर्कच्या पोलिस विभागाने घेतला आहे. २००३ पासून तेथे गुप्तचर टेहळणी पथके कार्यरत होती. या पथकांची फेररचना करून त्यातील गुप्तचरांना अलीकडेच नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत, असे ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे.
न्यूयॉर्कच्या पोलीस विभागाने आता या पथकाचे नामकरण ‘झोन असेसमेंट युनिट’ असे केले आहे. विल्यम ब्रॅटन यांनी न्यूयॉर्कच्या पोलीस आयुक्तपदाचा जानेवारीत कार्यभार हाती घेतला, तेव्हा ते पथक जवळपास निष्क्रिय होते. न्यूयॉर्कमध्ये रोजच्या रोज स्थानिक लोकसंख्येची शास्त्रीय स्थिती पाहून अतिरेकी हल्ल्यांबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकते, असे पोलीस प्रवक्ते स्टीफन डेव्हीस यांनी सांगितले. यापुढे आम्ही आवश्यक असेल तेव्हा माहिती घेऊ. नागरिक व पोलीस यांचा संपर्क कायम राहिल. गुप्त टेहळणीत न्यूयॉर्कमध्ये पोलीस साध्या वेशात मुस्लीम वस्त्यात गस्त घालतील व मुस्लीम लोकांची संभाषणे, हालचाली , ते कुठे खातात, कुठे प्रार्थना करतात, कुठल्या दुकानांमध्ये जातात याची माहिती ते गोळा करतील. नागरी हक्क गटांकडून या कार्यक्रमावर टीका झाली होती व मशिदी व मुस्लिमांच्या व्यापार उद्योगांवर गुप्तचरांची पाळत ठेवणे बंद करावे, असे याचिकेत म्हटले होते.
आता सध्याच्या पथकात १२ सदस्य असून ते वेगवेगळ्या पद्धतीने माहिती गोळा करतील. न्यूयॉर्कचे महापौर बिल डे ब्लासियो यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून पोलीस व नागरिकातील तणाव त्यामुळे कमी होईल. न्यूयॉर्क शहर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले आहे त्याची, यामुळे पूर्तता होईल, असे महापौरांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.