भारतरत्न लता मंगेशकर यांचा उल्लेख कथित पार्श्वगायिका(सो कॉल्ड प्लेबॅक सिंगर) असा करणाऱया न्यूयॉर्क टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने ट्विटवरून टीका होताच आपल्या वृत्ताबाबतचा खुलासा केला आहे.
‘प्लेबॅक सिंगिग’ हा प्रकार हॉलीवूडमध्ये नाही. त्यामुळे लता मंगेशकर या ‘प्लेबॅक सिंगर’ म्हणजे नेमक्या काय आहेत, हे वाचकांना समजावे यासाठी ‘सो कॉल्ड’ या शब्दाचा वापर करण्यात आला होता, असे या दैनिकाच्या संपादकीय मंडळाचे म्हणणे आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या दक्षिण आशिया ब्युरो चिफ एलेन बेरी यांनी याबाबत स्पष्टीकरण देणारे ट्विट केले आहे.’प्लेबॅक सिंगर’चा अर्थ माहित नाही अशा आमच्या भारताबाहेरील वाचकांसाठी हा उल्लेख करण्यात आला होता. यामागे कोणताही शेरेबाजी करण्याचा उद्देश नव्हता, असे बेरी यांनी म्हटले आहे.
‘एआयबी’च्या तन्मय भट यांनी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांचा वादग्रस्त व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचे वृत्त देताना न्यूयॉर्क टाईम्सने लतादीदींचा उल्लेख ‘सो कॉल्ड प्लेबॅक सिंगर’ असा केला होता. यावर नेटकरांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच ट्विटरवर न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीचा निषेध केला होता.