News Flash

लता मंगेशकर तथाकथित गायिका, ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ने उडवली खिल्ली

‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ने यापूर्वी ‘इंडियाज बजेट मिशन टू मार्स’ या व्यंगचित्रातही भारताची खोड काढली होती

| June 1, 2016 04:10 pm

लता मंगेशकर

कॉमेडियन तन्मय भट याने गानसम्राज्ञी लता मंगेशकर व क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यावर एका चित्रफितीत विनोदी टिप्पणी केल्यानंतर आता ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने तन्मय भटसारखीच अक्कल पाजळली असून, लता मंगेशकर या तथाकथित गायिका आहेत, असे सांगून त्यांचा आणखी अपमान केला आहे. भारतात तन्मय भट याने जे केले त्याच्या बाजूने व विरोधात अशी दोन्ही प्रकारची मते उमटली असली तरी परदेशात त्यामुळे नाहक अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एनवायटीच्या लेखात तन्मय भटच्या प्रकरणात म्हटले आहे, की तो वाद झाला ते ठीक आहे, पण पोलिसांनी फेसबुक व यूटय़ूबवरून ती दृश्यफीत काढून टाकण्यास सांगितले ते आमच्या मते योग्य नाही. भट याच्या दृश्यफितीचे वर्णन करताना ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे, की लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्याबाबत स्नॅपचॅटवर तयार केलेल्या या व्हिडिओ चित्रफितीत फेस स्वॅप फीचर वापरण्यात आले आहे. लता मंगेशकर यांची कारकीर्द १९४० पासून लोकांपुढे आहे. त्यांनी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले व त्यावर चित्रपट अभिनेते व अभिनेत्री नृत्य करीत असत. ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ने यापूर्वी ‘इंडियाज बजेट मिशन टू मार्स’ या व्यंगचित्रातही भारताची खोड काढली होती. त्या व्यंगचित्रात फेटा घातलेला एक भारतीय दिसत असून, एलिट स्पेस क्लब असे लिहिलेल्या खोलीच्या दरवाजावर गाय ढुश्या मारताना दाखवले होते. त्या व्यंगचित्राबाबत ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ने माफी मागितली होती. भारताचा, त्यांच्या सरकार व लोकांचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू यात नव्हता असे म्हटले होते. भारताच्या कमी खर्चाच्या मंगळ मोहिमेची टिंगलटवाळी करण्याचा तो प्रकार होता. २०१५ मध्ये ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने पुन्हा भारताची खोडी काढताना पॅरिस हवामान परिषदेच्या निमित्ताने एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते व त्यात कोळशाचे इंजिन असलेल्या रेल्वेपुढे हत्ती बसलेला दाखवला होता. पॅरिस हवामान परिषदेत भारताने अमेरिकेला हवी ती भूमिका घेतली नाही, त्याचा त्रागा या व्यंगचित्रातून व्यक्त झाला होता. गरीब देशच जास्त प्रदूषण करतात असा त्याचा अन्वयार्थ होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 4:10 pm

Web Title: new york times says lata mangeshkar is a so called singer
टॅग : Lata Mangeshkar
Next Stories
1 … आणि मोरोक्कोतील विद्यापीठाने भारताचा चुकीचा नकाशा झाकला
2 महागाईचा आणखी चटका; विनाअनुदानित सिलिंडर, जेट फ्युएल महागले
3 स्वयंसेवक संघाच्या शाळेत शिकणारा मुस्लिम विद्यार्थी दहावीत अव्वल
Just Now!
X