न्यूझीलंडमधील मध्य ख्राईस्टचर्चच्या दोन मशिदींमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणी न्यूझीलंड पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यात तीन पुरुष एका महिलेचा समावेश आहे. ख्राईस्टचर्चच्या वेगवेगळया भागात कारमध्ये स्फोटके सापडली असून ही सर्व स्फोटके निकामी करण्यात आली आहेत अशी माहिती पोलीस प्रमुख माईक बुश यांनी दिली. या गोळीबारात ४० जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत अशी माहिती न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी दिली.

बंदुकधाऱ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला आहे असे मशिदीतील प्रत्यक्षदर्शीने सांगितले. न्यूझीलंडमध्ये मशिदीबाहेर सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाने ख्राईस्टचर्चमधील नागरीकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. बांगलादेशचा संघ थोडक्यात या गोळीबारातून बचावला.

संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी ख्राईस्टचर्च येथे गंभीर परिस्थिती निर्माण झालं असल्याचं आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पूर्ण प्रयत्न करत आहेत.

हल्लेखोराने लष्कर जवानांसारखे कपडे परिधान केले होते अशी माहिती आहे. मात्र अद्याप या माहितीला दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान गोळीबारानंतर परिसरातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून लोकांना घराबाहेर न येण्याची सूचना करण्यात आली आहे.