17 July 2019

News Flash

न्यूझीलंडमधील भारतीय शत्रूच, हल्लेखोराने लिहिली होती पोस्ट

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये गोळीबार करणारा दहशतवादी ब्रेनटॉन टॅरॅन्टचा जाहीरनामा समोर आला आहे.

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये गोळीबार करणारा दहशतवादी ब्रेनटॉन टॅरॅन्टचा जाहीरनामा समोर आला आहे. या ७४ पानी जाहीरनाम्यात भारत, चीन आणि टर्कीचा उल्लेख असून त्याने भारतीयांना आक्रमणकारी ठरवले आहे. भारत, चीन आणि टर्की हे तीन आक्रमणकारी देश असून पूर्वेकडचे हे देश शत्रू असल्याचे त्याने जाहीरनाम्यात म्हटले आहे.

‘द ग्रेट रिप्लेसमेन्ट’ असे या जाहीरनाम्याचे शीर्षक असून हे आक्रमणकारी कुठून आले किंवा कधीही आले असतील तरी त्यांना युरोपच्या भूमीवरुन हद्दपार केले पाहिजे. ते आपले लोक नसून ते आपल्या भूमीवर राहत आहेत. त्यांना इकडून बाहेर काढलेच पाहिजे असे टॅरॅन्टने त्याच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

टॅरॅन्टने शुक्रवारी दोन मशिदींमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४९ निष्पाप नागरीकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात दोन भारतीय जखमी झाले असून नऊ जण बेपत्ता आहेत. प्रश्न, उत्तराच्या स्वरुपात हा जाहीरनामा आहे. दोन वर्ष आधी आपण या हल्ल्याचा कट आखला होता. ख्राईस्टचर्चची निवड तीन महिन्यांपूर्वी केली असे या दहशतवाद्याने म्हटले आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी हा काळा दिवस असून अशा हिंसाचाराला न्यूझीलंडमध्ये अजिबात स्थान नाही असे म्हटले आहे.

संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला होता. यासोबतच हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यात तीन पुरुष एका महिलेचा समावेश आहे. ख्राईस्टचर्चच्या वेगवेगळया भागात कारमध्ये स्फोटके सापडली. ही सर्व स्फोटके निकामी करण्यात आली.

First Published on March 16, 2019 9:00 am

Web Title: new zealand gunmans manifesto invaders from india and enemies in the east