जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आता जगभरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. यामध्ये न्यूझीलंडचाही आता समावेश झाला असून या देशाच्या संसदेमध्ये पुलवामा हल्ल्याच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता आंतरराष्ट्रीय दाबावाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे.


न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान विन्स्टन पिटर्स यांनी बुधवारी हा ठराव त्यांच्या संसदेत मांडला. हा ठराव मांडताना ते म्हणाले की, १४ फेब्रुवारी रोजी भारताच्या सीआरपीएफ जवानांवर एका दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. या घटनेच्या निधेधाचा ठराव मी मांडत आहे. याद्वारे भारताच्या या कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. तसेच शहीदांच्या कुटुंबियांप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करीत आहोत.

भारत दौऱ्यावर आलेले सौदी अरेबियाचे राजपूत्र महंमद बिन सलमान यांनी याप्रकरणी आम्ही तुमच्यासोबत आहोत असे म्हटले आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुलवामाचा हल्ला हा भयानक हल्ला असल्याचे म्हणत भारताला पूर्ण पाठींबा दर्शवला आहे. तसेच पाकिस्तानला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहरवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव फ्रान्स सरकार संयुक्त राष्ट्र संघात मांडणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पुलवामा हल्ल्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने आता पाकिस्तानची चांगलीच दमछाक झाल्याचे चित्र आहे. त्याचसाठी पाकिस्तानने चिडलेल्या भारताला शांत करण्यासाठी राष्ट्र संघात धाव घेतली असून तात्काळ याप्रकरणी मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे.