उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर मंगळवारी अलिगढ महापालिकेच्या नवनियुक्त नगरसेवक आणि महापौरांचा शपथविधी पार पडला. मात्र, या शपथविधी कार्यक्रमाला वादाचे गालबोट लागले. त्याला निमित्त ठरले उर्दू भाषा. बहुजन समाज पार्टीच्या महापौरांनी उर्दू भाषेतून शपथ ग्रहण केल्याने तेथे उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. मात्र, त्यानंतर हा कार्यक्रम सुरळीत पार पडला.

नुकत्याच झालेल्या अलिगढ महानगरपालिकेच्या निवडणुकीत महापौर म्हणून बसपाचे नगरसेवक मोहम्मद फुरकान यांची निवड झाली असून मंगळवारी त्यांचा शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात फुरकान यांनी मातृभाषा उर्दूमधून शपथ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला विरोध करीत तेथे उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली आणि कार्यक्रमात गोंधळ घातला.

या प्रकाराची अलिगढ प्रशासनाने गंभीर दखल घेतली. तसेच या शपथविधी कार्यक्रमाचे चित्रीकरण झाले असून ते पाहिल्यानंतर दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल असे यावेळी अलिगढचे जिल्हादंडाधिकारी हृषिकेश भास्कर यशोद यांनी सांगितले. यावेळी कुठल्याही धार्मिक घोषणा देण्यात आल्या नाहीत असे यशोद यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील मेरठ येथे देखील असाच प्रकार घडला असून एका कार्यक्रमात वंदे मातरमच्यावेळी मेरठच्या महापौर उभ्या न राहिल्याने प्रचंड मोठा वाद निर्माण झाला. यावेळी देखील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी करीत महापौरांच्या या कृतीबाबत त्यांना जाब विचारला.