प्राइम टाइम न्यूज डिबेटमध्ये धार्मिक विद्वेष पसरवल्याचा ठपका ठेवत वृत्त निवेदकावर गुन्हा दाखल झाला आहे. केरळमधल्या कोल्लाममध्ये ही घटना घडली आहे. मातृभूमी या टिव्ही चॅनेलच्या वेणू बालकृष्णन या न्यूज अँकरविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या (सीपीएम) एका युवा नेत्याने तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंडविधानाच्या 153 ए या कलमांतर्गत धार्मिक, जातीय विद्वेष पसरवण्याचा ठपका ठेवल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सात जून रोजी हा डिबेटचा कार्यक्रम प्रसारित झाला होता. पोलिसांचे अत्याचार या विषयावर ही चर्चा होती. वेणूनं इदादाथल उस्मान या अर्नाकुलम येथील तरूणाचा उल्लेख केला. वेणूनं म्हटलं, “मुस्लीम बांधवांनो, तुम्ही रमझाननिमित्त रोझे ठेवले आहेत, आणि तुम्ही लाळसुद्धा गिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी मात्र अशोभनीय कृत्य केलं आहे. हे असं राज्य आहे जिथं, रोझा पाळणाऱ्याला तुरुंगात टाकलंय.” वृत्तनिवेदकांनी मुख्यमत्र्यांच्या त्या वक्तव्याचा उल्लेख केला ज्यात ते म्हणाले होते की उस्मानने पोलिसांवर हल्ला केला होता आणि तो एका आंदोलनादरम्यान तामिळनाडूमध्ये बसची जाळपोळ केल्याप्रकरणातही गुंतलेला आहे.

विधी विभागाकडून संमती मिळाल्यानंतर वेणूविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यात आल्याचे कोल्लामचे पोलिस आयुक्त अरूल बी कृष्णा यांनी सांगितले. हे संवेदनशील प्रकरण आहे परंतु तक्रार आल्यानंतर ती आम्हाला दाखल करून घ्यावीच लागते असे कृष्ण म्हणाले. या प्रकरणी आम्ही राज्याच्या कायदेतत्ज्ञांकडून मत मागवलं आणि त्यांनी धार्मिक विद्वेष भडकावण्यासंदर्भातलं भारतीय दंडविधानाचं 153 ए हे कलम लागू होत असल्याचं सांगितल्याचं आयुक्त म्हणाले.

बाळकृष्ण यांच्याविरोधात असा गुन्हा दाखल करण्यास विरोधी नेते रमेश चेन्नीथला यांनी विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्री पिनारायी विजयन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाटेवर जात असून पत्रकारांचं स्वातंत्र्य हिरावण्याचा हा प्रकार असल्याचं ते म्हणाले.