वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईकला मलेशिया सरकार भारताकडे सोपवणार, असे वृत्त झळकत असतानाच नाईकने मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे. भारतात परतण्यासंदर्भातील वृत्त निराधार आणि खोटे असून तुर्तास माझा भारतात परतण्याचा बेत नाही. देशातील सरकार निष्पक्ष तपास करण्यास तयार असेल तेव्हाच मी भारतात परतेन, असे झाकीर नाईकने म्हटले आहे.

झाकीर नाईकच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु होती. मलेशिया सरकार झाकीर नाईकला भारताकडे सोपवणार, असे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, झाकीर नाईकने हे वृत्त फेटाळून लावले. “माझा तुर्तास भारतात परतण्याचा बेत नाही, कारण मला भारतातील न्यायव्यवस्थेत मला निष्पक्ष वागणूक मिळेल, असे वाटत नाही. ज्या वेळेला अल्लाहच्या इच्छेनुसार भारत सरकार माझ्याशी न्यायपूर्ण वागेल, त्यावेळी मी निश्चितच मायदेशी परतेन,” असे झाकीरने म्हटले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) प्रवक्ते अलोक मित्तल म्हणाले, यासंदर्भात आमच्याकडे सध्या कोणतीही माहिती नाही. आम्ही या वृत्ताबाबत माहिती घेत आहोत.

झाकीर नाईकचे प्रत्यार्पण : मलेशियातील सत्तांतर भारताच्या पथ्यावर

डॉ. झाकीर नाईक हा सध्या मलेशियात आहे. बांगलादेशातील काही दहशतवाद्यांनी आपण नाईकच्या भाषणांनी प्रभावित होऊन हा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले होते. त्यानंतर नाईकविरोधात चौकशी सुरु करण्यात आली होती. यानंतर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या चिथावणीखोर भाषणांद्वारे तरुणांना दहशतवादाकडे वळण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉ. झाकीर नाईकविरोधात गुन्हा दाखल झाला होता. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवरही गंभीर आरोप होते. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून निधी गोळा करून तो दहशतवादी कारवायांसाठी उपलब्ध करण्याचा आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणानंतर झाकीर नाईक दुबईत गेला आणि तिथून तो अद्याप मायदेशी परतलेला नाही.