अनेक ठिकाणी प्रती जप्त; छापखाना कर्मचाऱ्यांना अटक

काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा नेता बुरहान वानी चकमकीत मारला गेल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारानंतर काही भागात संचारबंदी अजूनही कायम आहे. तेथे वृत्तपत्रे विक्रीस येऊ शकली नाहीत. काश्मीर खोऱ्यात आजचा दिवस लोकांना वृत्तपत्रांविना काढावा लागला. अधिकाऱ्यांनी काही प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांवर छापे टाकून वृत्तपत्राच्या छापील प्रती जप्त केल्याचे वृत्त आहे. इंग्रजी, उर्दू व काश्मिरी अशा कुठल्याही भाषेतील वृत्तपत्रे काश्मीर खोऱ्यात आज लोकापर्यंत पोहोचू शकली नाहीत. एक प्रकारे प्रसारमाध्यमांची ही मुस्कटदाबी आहे असा आरोप करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांचे यावर काय म्हणणे आहे, त्यांनी खरोखर काय कारवाई केली हे समजू शकलेले नाही.

वृत्तपत्रातील आक्षेपार्ह माहितीने काश्मीरातील संघर्ष आणखी चिघळेल अशी भीती वाटल्याने पोलिसांनी रानग्रेथ औद्योगिक वसाहतीत दोन वृत्तपत्रांच्या छापखान्यांवर छापे टाकले व त्यांची छपाई होऊ दिली नाही. ज्यांनी छपाई केली ती वृत्तपत्रे जप्त करण्यात आली. काश्मीरमधील ग्रेटर काश्मीर या सर्वात जास्त वितरण असलेल्या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर असा आरोप करण्यात आला की, रात्री ग्रेटर काश्मीर कार्पोरेट कार्यालयावर छापा टाकून वृत्तपत्र स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करण्यात आली. पोलिसांनी छापखान्यातील फोरमन बिजू चौधरी व इतर दोन जणांना अटक केली. पोलिसांनी ग्रेटर काश्मीर वृत्तपत्राच्या छपाईसाठी तयार केलेल्या प्लेट्स जप्त केल्या. काश्मीर उझ्मा या वृत्तपत्राच्या ५० हजार प्रती जप्त करण्यात आल्या. जीकेसी प्रेस बंद पाडण्यात आला. केटी प्रेसमध्ये काश्मीर रीडर, काश्मीर टाइम्स, काश्मीर ऑब्झर्वर व द काश्मीर मॉनिटर ही वृत्तपत्रे छापली जातात, तेथे छापा टाकण्यात आला असा दावा छापखान्याच्या मालकाने केला आहे. पोलिसांनी अनेक वृत्तपत्रांच्या प्रती जप्त केल्या. फोरमन, मशीनमन, हेल्पर यांना अटक केली.  लालचौक केंद्रावर पोलिसांनी वृत्तपत्रांच्या प्रती जप्त केल्या, काश्मीर इमेजेसचे संपादक बशीर मंझार यांनी सांगितले की, पोलिसांनी वृत्तपत्रांच्या छापखान्यांवर छापे टाकून मुद्रण साहित्य जप्त केले. केबल टीव्ही नेटवर्क राज्यात बंद करण्यात आले आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

काश्मीर खोऱ्यात संचारबंदी कायम

काश्मीर खोऱ्यात शनिवारी संचारबंदी जारी असल्याने सलग आठव्या दिवशीही येथील सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. हिजबुलचा कमांडर वानी याला कंठस्नान घालण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकात आतापर्यंत ३८ जण ठार झाले असून ३१०० हून अधिक जखमी झाले आहेत.

काश्मीर खोऱ्यातील सर्व म्हणजे १० जिल्ह्य़ांत शनिवारीही खबरदारीचे उपाय म्हणून संचारबंदी जारी होती. खोऱ्यात शुक्रवारी दगडफेकीच्या अनेक घटना घडल्याने संचारबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.

कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत याची खबरदारी म्हणून खोऱ्यातील भ्रमणध्वनी सेवा स्थगित करण्यात आली आहे. केवळ बीएसएनएलची सेवा काही प्रमाणात सुरू आहे. मोबाइल इंटरनेट सेवाही सातव्या दिवशी स्थगित ठेवण्यात आल्या होत्या.