मुख्यमंत्री कार्यालयावर सीबीआयचा छापा पडल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारविरोधात घणाघाती आरोपांची मोठी आघाडीच उघडली आहे. येत्या काही दिवसांत दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया किंवा आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या कार्यालयांवर मोदींच्या आदेशानुसार सीबीआय छापे टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिल्याचे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.
सीबीआयकडे विरोधकांना संपविण्याचे काम- केजरीवाल
मोदींकडून अशाप्रकारचा कट आखला जात असेल तर त्याला सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचेही आव्हान केजरीवालांनी दिले आहे. मोदींनी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही सत्याच्या मार्गाने चालणारे आहोत. देव आमच्या सोबत आहे. तुम्ही आमचे काहीच वाईट करू शकणार नाही, असे केजरीवाल यांनी त्यापुढील ट्विटमध्ये नमूद केले आहे. केजरीवाल यांच्या घणाघाती आरोपामुळे ‘आप’ आणि केंद्र सरकारमधील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता आहे.