भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर नुकतंच ‘तौते’ चक्रीवादळ धडकल्यानंतर बसलेल्या धक्क्यातून बचावकार्य करणाऱ्या यंत्रणा सावरल्या नाहीत, तोच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नवं चक्रीवादळ घोंघावू लागलं आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक वेगाने वाढला, तर येत्या २६ मे रोजी ‘यास’ चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या दृष्टीने आता केंद्र सरकारने देखील तयारी सुरू केली असून पूर्व किनारपट्टीवर ज्या ज्या राज्यांना ‘यास’ चक्रीवादळाचा धोका आहे, त्या राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, आरोग्यविषयक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे देखील निर्देश मार्गदर्शक सूचनांमध्ये देण्यात आले आहेत. चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीसाठी NDRF च्या तुकड्या देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

कुठे बसणार ‘यास’चा फटका?

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार २६ मे रोजी यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल किंवा ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून पश्चिम बंगाल आणि ओडिशासोबतच आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबारमधील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील या राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून किनारी भागामध्ये आरोग्य व्यवस्था अधिक वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, यास चक्रीवादळाच्या मार्गात येणाऱ्या प्रदेशामध्ये असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत देण्याचं आश्वास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.

 

NDRF नं कंबर कसली!

यास चक्रीवादळ २६ मे रोजी पश्चिम बंगाल किंवा ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता गृहित धरून एनडीआरएफ अर्थात National Disaster Response Force सज्ज झाली आहे. एनडीआरएफनं आपल्या काही टीम तौते चक्रीवादळामुळे बसलेल्या तडाख्यामध्ये बचावकार्य आणि पुनर्वसन कार्यासाठी पाठवल्या होत्या. त्या टीम माघारी बोलावण्यात येत आहेत. तसेच काही तुकड्या पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पाठवायला सुरुवात देखील करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ‘यास’ चक्रीवादळाच्या प्रवासासंदर्भात हवामान विभागाकडून जसजशी माहिती दिली जाईल, त्याप्रमाणे एनडीआरएफच्या इतर तुकड्या त्या त्या ठिकाणी मदतकार्यासाठी पाठवल्या जातील, असं देखील NDRF कडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, तौते चक्रीवादळादरम्यान पाठवण्यात आलेल्या एनडीआरएफच्या तुकड्यांमधील जवानांना करोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण शरीर झाकलं जाईल असे कपडे आणि फेस मास्क देण्यात आले होते. तसेच, या सर्व जवानांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, असं देखील एनडीआरएफकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

२१ मेपासून सागरी परिस्थिती धोकादायक!

दरम्यान, २१ मेपासूनच बंगालच्या उपसागरातील परिस्थिती धोकादायक असणार आहे. वारे वेगाने वाहणार असून त्यामुळे समुद्र खवळलेला असू शकतो. त्यामुळे मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारांनी आपल्या बोटी पुन्हा किनाऱ्यावर आणाव्यात, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. अंदाजे २२ मेपासून हा कमी दाबाचा पट्टा उत्तर अंदमानजवळच्या समुद्रात तयार व्हायला सुरुवात होईल. २२ आणि २३ मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे. अशीच पर्जन्यवृष्टी ओडिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि आसाममध्ये देखील होईल. हे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याच्या दिशेनुसार ओडिशा किंवा पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

वाचा सविस्तर – ‘तौते’ शांत झालं, आता ‘यास’ चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार! भारतीय हवामान विभागाचा इशारा!

गेल्या वर्षी देखील बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अम्फान’ या चक्रीवादळाचा पश्चिम बंगालला तडाखा बसला होता. यामध्ये कोलकाता, २४ उत्तर परगणा, दक्षिण परगणा या भागामध्ये या वादळाचा तडाखा बसला. तिथून पुढे हे वादळ बांग्लादेशच्या दिशेनं वळालं होतं.

‘तौते’ नाव म्यानमारने दिलं, तर ‘यास’ हे नाव…

भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या वादळांना या भागातील देशांकडून नावं दिली जातात. पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळाळा म्यानमारनं ‘तौते’ हे नाव दिलं होतं. चक्रीवादळाला दिलेलं हे नाव एका सरड्याच्या प्रजातीचं आहे. प्रचंड आवाज करणाऱ्या सरड्याची प्रजाती GECKO वरून हे नाव देण्यात आलं आहे. सरड्याला तौत्के म्हटलं जातं, ज्याचा उच्चार तौते असा होतो. त्याचप्रमाणे, यापुढे जे वादळ निर्माण होईल, त्याला ‘यास’ असं नाव दिलं जाईल. ओमेन देशाने हे नाव दिलं आहे.