पुढील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर देशातील जनतेचे आव्हान असेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. ‘नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कराचा फटका सामान्य जनतेला सहन करावा लागला आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जनताच मोदींसमोर आव्हान उभे करेल,’ असे केजरीवाल म्हणाले. आम आदमी पक्षाच्या सोशल मीडियाची धुरा सांभाळणाऱ्या अंकित लाल यांच्या ‘इंडिया सोशल’ पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये झाले. या कार्यक्रमाला अरविंद केजरीवाल आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी उपस्थित होते.

लोकांच्या मनात सरकारबद्दल मोठी नाराजी असल्याचे यावेळी केजरीवालांनी म्हटले. ‘नोटाबंदी, जीएसटीच्या निर्णयामुळे लोक नाराज आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयांचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. जनता आता त्यांच्या मनातील नाराजी उघडपणे व्यक्त करु लागली आहे. त्यामुळे पुढील निवडणूक जनताच लढवेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एखादा पक्ष किंवा एखादा राजकीय नेता किती महत्त्वाचा असेल, याबद्दल मला माहिती नाही. मात्र पुढील निवडणूक ही मोदी विरुद्ध जनता अशीच असेल, असे मला वाटते. जनताच मोदींचा पराभव करेल,’ असे केजरीवाल म्हणाले. यावेळी केजरीवालांनी देशातील धार्मिक आणि जातीय राजकारणावरही भाष्य केले. ‘ते हिंदू-मुस्लिम, दलित-राजपूत, पद्मावती, गोमाता अशा मुद्द्यांवरुन राजकारण करु शकतात. मात्र जेव्हा पोटावर पाय येतो, तेव्हा माणूस सर्वकाही विसरुन जातो. पहिल्यांदा माणसाला पोटापाण्याची आणि मुलांची चिंता असते,’ असेही त्यांनी म्हटले.

अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रिपदाची धुरा सांभाळलेल्या अरुण शौरींनीदेखील मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली. ‘विकासाचे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेत आले होते. मात्र सरकारला आश्वासनांची पूर्तता करता आली नाही. आर्थिक सुधारणांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले. आर्थिक सुधारणांची प्रक्रिया दीर्घकाळ चालते. मात्र सरकारने आर्थिक सुधारणांसाठी मोठे निर्णय घेतले नाहीत,’ असे शौरींनी म्हटले.

२०१९ च्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ‘देश खरोखरच संकटात सापडला आहे, असे तुम्हाला वाटत असल्यास सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे,’ असे शौरी म्हणाले. ‘प्रत्येक लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकच उमेदवार द्यावा,’ असे त्यांनी सुचवले. यावेळी त्यांनी राजकीय पक्षांकडून होणाऱ्या सोशल मीडियाच्या गैरवापरावरही टीका केली. ‘राजकीय पक्षांकडून सोशल मीडियाचा सोयीस्करपणे गैरवापर सुरु आहे. आपल्या विचारधारेच्या विरोधात असणाऱ्या लोकांवर खालच्या शब्दांमध्ये टीका करण्याचे काम भाजपकडून सोशल मीडियावर केले जात आहे,’ असे शौरी म्हणाले.