|| कृष्णन कौशिक, एक्स्प्रेस वृत्तसेवा

नवी दिल्ली : लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मे २०२० पासून भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी रविवारी भारत आणि चीनच्या लष्करी कमांडर स्तरावर चर्चेची पुढील फेरी होणार आहे. जवळपास अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर दोन्ही देशांमध्ये चर्चेची फेरी होणार आहे.

लेफ्ट. जन. पीजीके मेनन (१४व्या कॉप्र्सचे कमांडर) आणि दक्षिण क्षीनजिआंग लष्करी क्षेत्राचे कमांडर मे. जन. लिऊ लिन यांच्यात रविवारी सकाळी चुशूलजवळच्या मोल्दो (चीनच्या हद्दीत) येथे चर्चा होणार आहे. भारताने पाठविलेल्या स्मरणपत्राला प्रतिसाद देऊन ही चर्चा होणार आहे. या परिसरामध्ये दोन्ही देशांचे प्रत्येकी ५० हजार सैन्य बेमुदत कलावधीसाठी तैनात करण्यात आले आहे. या चर्चेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. यापूर्वी मंत्रालयातील संयुक्त सचिव (पूर्व आशिया) नवीन श्रीवास्तव हे तीन बैठकांना हजर होते. लष्करी कमांडरांची शेवटची बैठक ६ नोव्हेंबर रोजी झाली होती, तर राजनैतिक स्तरावरील चर्चा १८ डिसेंबर रोजी झाली होती.

सैन्य माघारी घेण्याचे संकेत चीनने दिले असल्याचे एका ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. तर दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकण्यापूर्वी जी स्थिती होती तेथे चीनच्या सैनिकांनी जावे, असा भारताचा आग्रह आहे. दोन्ही देशांमध्ये सैन्य माघारी घेण्याबाबत समझोता झालेला नाही, चुशूल उपक्षेत्रातून भारतीय सैन्याने माघार घ्यावी, असा चीनचा आग्रह आहे तर या क्षेत्रातील संघर्षाच्या सर्व ठिकाणांबाबत ठराव झाला पाहिजे, असे भारताने स्पष्ट केले आहे.