सोशल मीडियावर सेल्फीची मोठी क्रेझ सध्या दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मादी यांनीही ‘सेल्फी विथ डॉटर’ ही मोहीम सुरू केली होती. तेव्हा हजारो लोकांनी आपल्या मुलींबरोबरची सेल्फी शेअर केली होती. अशीच एक मोहीम आता कोलकातामधील एक स्वंयसेवी संस्थेने गाय वाचवण्यासाठी सुरू केली आहे. ‘सेल्फी विथ काऊ’ असं त्यांच्या अभियानाचे नाव आहे. या अभियानाला ‘काऊफाय’ असे नावही देण्यात आले आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे हे अभियान सुरू करणारी स्वंयसेवी संस्था ‘गो सेवा परिवार’ने म्हटले आहे.

या संस्थेशी निगडीत असलेले अभिषेक प्रताप सिंह यांनी ‘पीटीआय’ला सांगितले की, गायीच्या सुरक्षेची राजकारण किंवा धर्माशी सांगड घालू नये. सामाजिक आणि वैज्ञानिक उपयोगासाठी गायीची सुरक्षा केली पाहिजे. प्रत्येक उत्पादन गायीपासून आहे, विशेष म्हणजे गायीचं शेण आणि गोमूत्रही मूल्यवान असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून लोकांना गायी पासूनच्या आर्थिक आणि औषधी फायद्यांची माहिती देण्यात येईल. आमच्या या अभियानाला प्रतिसादही चांगला मिळतोय. विशेषत: युवकांनी चालवलेल्या या मोहिमेचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. या संस्थेने यापूर्वी गायीच्या संरक्षणासाठी २०१५ मध्येही एका विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. त्यावेळी ७०० हून अधिक लोकांनी भाग घेतला होता. सेल्फी विथ काऊ स्पर्धेत भाग घेण्यासाठी ३१ डिसेंबर हा अखेरचा दिवस आहे. विजेत्याची घोषणा पुढील वर्षी २१ जानेवारी रोजी केली जाईल.