गेल्याच महिन्यात यात्रेकरूंना आवश्यक सुविधा न पुरवल्याच्या कारणावरून हरित लवादाने मंदिर प्रशासनाची कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाला यासंबंधीचा स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांनी अमरनाथ मंदिरात मंत्रपठण आणि घंटा वाजवण्यास मनाई करण्याचे आदेश दिले. जम्मू काश्मीरमध्ये असलेले अमरनाथ मंदिर समुद्रसपाटीपासून ३,८८८ मीटर उंचीवर आहे. यापुढील काळात मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांना त्यांच्याकडील वस्तू आणि मोबाईल बाहेर ठेवावे लागतील. यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे आदेशही लवादाने दिले आहेत. तसेच मंदिराच्या गुहेत प्रवेश केल्यानंतर भाविकांनी ‘मंत्रजप’ किंवा ‘जयजयकार’ करू नये, असेही लवादाने म्हटले आहे. या आदेशाची त्वरीत आणि सक्त अंमलबजावणी व्हावी. याशिवाय, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच्या शेवटच्या चौकीपासून ते गुहेपर्यंत भाविकांनी एकेरी रांगेतच जावे, असेही लवादाने सांगितले.

हरित लवादाकडून अमरनाथ मंदिर व्यवस्थापनाची कानउघाडणी

अमरनाथ यात्रेदरम्यान दुर्घटना टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये मंदिर प्रशासनाला काही सूचना दिल्या होत्या. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी या आदेशांचे कितपत पालन होत आहे, याबद्दलचे स्पष्टीकरण लवादाने मागवले होते. गेल्याच महिन्यात हरित लवादाने वैष्णोदेवी मंदिर प्रशासनालाही विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एका दिवसात मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या ५० हजारापर्यंत निश्चित करण्यात आली होती. याशिवाय, या परिसरात कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही लवादाकडून देण्यात आले होते.