पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या मांजावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) घेतला आहे. एनजीटीने मंगळवारी यासंदर्भातील निर्णयाची घोषणा केली. त्यानुसार आता नायलॉन आणि अविघटनशील पदार्थांपासून बनविण्यात येणाऱ्या मांजावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाजारात धोकादायक नायलॉन मांजाची खरेदी-विक्री व वापर सुरू होता. पर्यावरणाला हानीकारक, प्राणी व पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरलेला तसेच आबालवृद्ध व वाहनचालक ते पादचाऱ्यांचा हकनाक बळी घेणाऱ्या नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली होती. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा नागरिकांचे गळे चिरणारा आणि झाडांवर अडकलेला मांजा पक्ष्यांना जखमी करणारा ठरला आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींनी या मांजावर बंदीची मागणी केली होती. मात्र, या निर्णयाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नव्हती. या पार्श्वभूमीवर आज हरित लवादाकडून याबाबत सक्तीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये शहरी भागात नायलॉनच्या मांजामुळे नागरिकांचे विशेषत: वाहनधारकांचे नाक, कान, गळे चिरण्याच्या घटना पतंगोत्सवाच्या सुमारास घडताहेत. यात पक्षीदेखील मोठय़ा प्रमाणात जखमी होतात.

त्यामुळे या मांजाच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांनीही या मांजाचा वापर टाळण्याची ताकीद देणारी सूचना जारी केली होती. मात्र, तरीही यंदा हे आदेश धाब्यावर बसवून पंतग उडवण्यासाठी नायलॉनच्या मांजाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या काळात ५० हून अधिक पक्षी मांजामुळे गंभीर जखमी झाल्याचे समोर आले होते. मांजामुळे पंख व मानेला जखम झाल्याने या पक्ष्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मकरसंक्रांतीच्या काळात हा मांजा जवळ बाळगल्यास अथवा त्याची विक्री केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले होते. मात्र तरीही या मांजाचा वापर सर्रासपणे करण्यात आला होता.