पोलीस भरतीदरम्यान उमेदवारांच्या छातीवर जात लिहिल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मध्य प्रदेश सरकारला नोटीस पाठवली आहे. मध्य प्रदेशातील पोलीस भरतीत मैदानी चाचणीत निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. यामध्ये आरक्षित वर्गातील उमेदवारांचाही समावेश होता. या उमेदवारांची स्वतंत्र वर्गवारी करणे सोपे व्हावे, यासाठी रुग्णालय प्रशासनाने उमेदवारांच्या छातीवर SC/ST असे लिहिले होते.
उमेदवारांच्या छातीवर SC/ST लिहिण्यात आलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. आरक्षित उमेदवारांची ओळख पटवणं सोपं जावं यासाठी उमेदवारांच्या छातीवर जात लिहिली गेली असल्याचं समोर आलं होतं.
पोलीस अधिक्षक बिरेंद्र कुमार सिंह यांनी उमेदवारांच्या छातीवर जात लिहिल्याचं मान्य केलं होतं, मात्र अधिकाऱ्यांना अशाप्रकारे वैद्यकीय चाचणी घेण्याची परवानगी असल्याचं त्यांनी नाकारलं होतं. वाद वाढू लागल्यानंतर याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणाचा निषेध केली होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही हे प्रकरण म्हणजे थेट लोकशाहीवर हल्ला असल्याची टीका केली होती. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली होती. केंद्रीय मंत्री आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनीही हा अपमान असल्याची टीका करत संताप व्यक्त केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2018 7:23 pm