वन्नाक्राय रॅनसमवेअर निर्मितीप्रकरणी न्यायाधीशांचा आदेश

वन्नाक्राय या रॅनसमवेअरची निर्मिती व त्याचा प्रसार केल्याच्या प्रकरणी ब्रिटिश सायबर सुरक्षा संशोधक मार्कुस हचिन्स याच्या सुटकेसाठी ३० हजार अमेरिकी डॉलर्सचा जामीन लासवेगासच्या न्यायाधीशांनी मागितला असून त्याची लगेच सुटका होण्याची शक्यता कमी आहे. सायबर सुरक्षा विश्वातील प्रमुख व्यक्ती म्हणून त्याला माहिती सुरक्षा समुदायाचा पाठिंबा आहे व त्याच्यावरील आरोपांना उत्तर दिले जाईल, असे त्याच्या वकिलांनी सांगितले. त्याला शुक्रवारी पकडले होते त्यामुळे लगेच जामीनासाठी काही करणे शक्य नव्हते. आता त्याला मंगळवारी पुन्हा मिलवाकी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हचिन्स हा ब्रिटनचा रहिवासी असून मे महिन्यात त्याने वन्नाक्राय रॅनसमवेअरचा प्रसार रोखण्यास मदत केली होती. त्यामुळे अटकेनंतर सायबर सुरक्षा विभागातील अनेक जण त्याच्या पाठीशी होते. तो एथिकल हॅकर आहे. त्याच्या सुटकेसाठीच्या ज्या अटी आहेत त्यांचे कॅलिफोर्निया विद्यापीठाचे संगणक वैज्ञानिक निकोलस वीव्हर यांनी स्वागत केले आहे. त्याच्या वकील अड्रियन लोबो यांनी सांगितले की, त्याच्या जामीनाचा पैसा त्याचे समर्थक, अमेरिकेतील कुटुंबीय देऊ शकतील. दी इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाउंडेशनने त्याला वकील मिळवून देण्यात मदत केली आहे.

सुनावणीच्यावेळी अमेरिकेचे सहायक सरकारी वकील डॅन कोहिग यांनी सांगितले की, वन्नाक्राय रॅनसमवेअर तयार करून विकल्याची कबुली हचिन्स याने दिली आहे.  संगणक वैज्ञानिक वीव्हर यांनी सांगितले की, संघराज्य अभियोक्त्यांनी त्याच्यावरील आरोपांची माहिती दिलेली नाही.

दी इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाउंडेशनचे कुर्ट ओप्साल यांनी सांगितले की, हचिन्स याच्या अटकेने संशोधक समुदाय व सरकार यांच्यातील दरी वाढली आहे.