आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना हैदराबादमधून अटक करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ही कारवाई केली असून अब्दुल्ला बासिथ (वय २४) आणि अब्दुल कादीर (वय १९) अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.

एनआयएने हैदराबादमधील सात ठिकाणांवर नुकताच छापा टाकला होता. आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून आठ जणांची चौकशी करण्यात आली. यात बासिथ आणि अब्दुल कादीर या दोघांचा समावेश होता. या दोघांचाही आयसिसशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.  आयसिससाठी नवीन तरुणांची भरती करणे तसेच भारतात दहशतवादी कारवायांचा कट रचल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एनआयएचे महानिरीक्षक अलोक मित्तल यांनी दिली.

हैदराबादमधील हाफिजबाबा नगर परिसरात राहणाऱ्या बासिथला यापूर्वी २०१४ आणि २०१५ मध्येही अटक झाली होती. २०१४ मध्ये हैदराबादमधील चार तरुण बांगलादेशमार्गे सीरियात जाण्याच्या प्रयत्नात होते. यात बासिथचाही समावेश होता. चौघांना मालदा येथून ताब्यात घेण्यात आले होते. चारही तरुणांचे वय त्यावेळी कमी असल्याने पोलिसांनी समुपदेशन करुन त्यांना सोडून दिले होते. मात्र यानंतरही बासिथ आयसिससाठी काम करत होता. डिसेंबर २०१५ मध्ये पुन्हा एकदा बासिथने त्याचा चुलत भाऊ आणि आणखी एका तरुणासोबत सीरियात जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नागपूर विमानतळावरुन त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हैदराबाद पोलिसांनी त्यांना अटक करुन २०१७ मध्ये त्यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केले. पोलिसांच्या रडारवर असूनही बासिथ सोशल मीडियाद्वारे आयसिसच्या संपर्कात होता हे समोर आले. शेवटी पोलिसांनी त्याला तिसऱ्यांदा अटक केली.  दरम्यान, पोलिसांनी बासिथ, कादीरसह चौकशी केलेल्या पाचही तरुणांचे मोबाईल आणि लॅपटॉपही जप्त केले आहेत.