जम्मू-काश्मीरमधील फुटिरतावादी महिला नेता आणि दुख्तरान-ए-मिल्लतची प्रमुख आसिया अंद्राबी हीचे श्रीनगर येथील घर सील करण्यात आले आहे. टेरर फंडिंगप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) ही कारवाई केली आहे. त्यामुळे आता तिची चौकशी पूर्ण होईपर्यंत अंद्राबी आपले घर विकू शकत नाही किंवा त्याचा वापर व्यावसायीक कारणांसाठी वापर करु शकत नाही.


दरम्यान, सध्या कोठडीत असलेल्या अंद्राबीची तुरुंगातून सुटका झाली तर मात्र ती आपल्या घरात राहू शकते. अंद्राबी सध्या एनआयएच्या कोठडीत असून नुकतेच चौकशीदरम्यान अंद्राबीने हे कबूल केले की, पाकिस्तानातून तिला काश्मीर खोऱ्यात आपल्या दुख्तरान-ए-मिल्लत या संघटनेकडून महिलांचे आंदोलन घडवून आणण्यासाठी पैसा मिळत होता.


मुंबई स्फोटाचा सुत्रधार हाफिज सईद यांच्या आदेशनुसार काश्मीर खोऱ्यात भारतीय जवानांवर दगडफेक घडवून आणल्याचा आरोपही अंद्राबीवर आहे. काश्मीर विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतलेली अंद्राबी चार वर्षांपूर्वी पाकिस्तानी झेंडा फडकावणे आणि पाकिस्तानी राष्ट्रगीत गायल्यामुळे चर्चेत आली होती.

आसिया अंद्राबीच्या दोन मुलांपैकी एक मलेशियात तर दुसरा ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहे. अंद्राबीप्रमाणे फुटिरतावादी नेता गिलानी याचा जावई आणि तहरीक-ए-हुर्रियतचा सदस्य अल्ताफ अहमद शाह ऊर्फ फंटूश याची मुलगी तुर्कीमध्ये पत्रकार आहे. तर दुसरी मुलगी पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तसेच अंद्राबीचा भाचा पाकिस्तानी सैन्यात कॅप्टन आहे. तर तिचा एक नातेवाईक पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हस्तक आहे.