दहशतवाद्यांच्या आर्थिक नाडय़ा आवळण्याचा प्रयत्न

आज पहाटेच्या वेळी राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयएने काश्मीर, हरयाणा व दिल्ली येथे २३ ठिकाणी दहशतवादाला होत असलेल्या आíथक पुरवठय़ाच्या संदर्भात छापे टाकले. एनआयएची पथके गेले काही दिवस काश्मीरमध्ये होती. त्यानंतर त्यांनी एफआयआर दाखल केले.

श्रीनगर शहरात हुमाहुमा भागात एनआयएचे कार्यालय आहे. तेथून पथके बंदोबस्तात काम करीत आहेत. एनआयने कट्टरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे जावई अल्ताफ फंटुश, उद्योजक झहूर वटली, मिरवेझ उमर फारूख यांच्या अवामी अ‍ॅक्शन कमिटीचे नेते शहीद उल इस्लाम व हुर्रियत तसेच जेकेएलएफच्या काही दुय्यम नेत्यांवर छापे टाकले आहेत.

काश्मीर खोऱ्यात विविध ठिकाणी १.५ कोटी रुपये जप्त केले असून काही आक्षेपार्ह कागदपत्रांची छाननी सुरू आहे. २००२ मध्ये प्राप्तिकर खात्याने फुटीरतावादी नेत्यांवर छापे टाकले होते. त्यात गिलानी यांचा समावेश होता, पण त्या वेळी गुन्हेगारी खटला दाखल केला नव्हता.

आताच्या एफआयआरमध्ये एकाही फुटीरतावादी नेत्याचे नाव नसले तरी हुíरयत कॉन्फरन्स, हिज्बुल मुजाहिद्दीन, दुखतरण ए मिल्लत, लष्कर ए तोयबा या संघटनांची नावे आहेत.

एनआयएने याआधी प्राथमिक चौकशीत हरयाणातील दोन जणांसह एकूण आठ हवाला व्यापाऱ्यांवर छापे टाकले होते. फुटीरतावादी नेते नयीम खान, याने पाकिस्तानातून पसे मिळत असल्याचे कबूल केले होते. फुटीरतावाद्यांना लष्कर ए तोयबाकडून पसे मिळत आहेत व त्याचा वापर काश्मीरमधील विध्वंसक कारवायांसाठी केला जात आहे. यात अनेक ठिकाणी शाळा व कार्यालये जाळण्यात आल्या आहेत.