नवी दिल्ली : देशभरात दहशत माजवण्याचा कट रचल्याच्या प्रकरणात, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधाराच्या जैश-ए-मोहम्मदच्या ४ दहशतवादी साथीदारांविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले.

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मुदस्सीर अहमद खान याचा जवळचा साथीदार असलेला जैशचा सज्जाद अहमद खान हा देशभरात दहशतवादी कृत्ये करण्याचे कारस्थान करत असल्याचा दावा करणारे आरोपपत्र एनआयएने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दाखल केले होते.

यानंतर, जम्मू-काश्मीरमधील पुलवामाचे रहिवासी असलेले सज्जाद अहमद खान (२७), बिलाल अहमद मीर (२३), इश्फाक अहमद भट (२४) व मेहराजुद्दीन चोपन (२२) या चौघांविरुद्ध एनआयएने पुरवणी आरोपपत्र दाखल केले. गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, भारत सरकारविरुद्ध युद्ध छेडणे किंवा त्यासाठी प्रोत्साहन देणे या गुन्ह्य़ांसाठी भारतीय दंड विधानांतर्गत, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) विविध कलमांखाली, तसेच स्फोटक वस्तू कायद्यान्वये त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.

आरोपी हे प्रतिबंधित जैश-ए-मोहम्मद संघटनेचे सदस्य असून, दहशतवादी हल्ले करण्याची आणि जैशच्या कारवायांचा प्रसार करण्याची योजना ते आखत असल्याचे तपासात आढळले आहे, असे एनआयएने सांगितले. मरण पावलेला दहशतवादी मुदस्सीर अहमद खान हा या कटामागील सूत्रधार होता. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचाही तो मुख्य सूत्रधार होता आणि गेल्या वर्षी १० मार्चला त्राल भागात पोलीस व सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तो मारला गेला, असेही एनआयएने नमूद केले आहे.