सीमा सुरक्षा दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर उधमपूर येथे पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांनी जो हल्ला केला होता, त्यात दोन जवान ठार झाले होते, त्यात जिवंत पकडण्यात आलेला पाकिस्तानी अतिरेकी नावेद याकुब याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) १४ दिवसांची कोठडी दिली आहे.
नावेद हा लष्कर ए तोयबाचा अतिरेकी असून त्याला कडक सुरक्षेत काल सायंकाळी जम्मूत आणण्यात आले. या अतिरेक्याला लष्कर ए तोयबाकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत सुरक्षा दलांना मिळाले आहेत. त्याला राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयात आज सकाळी हजर करण्यात आले असता कोठडी देण्यात आले.
एनआयएने या प्रकरणाचा तपास गेल्या आठवडय़ात हाती घेतला असून भारतीय दंड विधान संहितेच्या विविध कलमानुसार नावेद याच्या विरोधात देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा तसेच बेकायदा कारवाया प्रतिबंधक व शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एनआयए व जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणी अकरा जणांचे जाबजबाब घेतले असून त्यांना ताब्यात घेतले आहे. नावेद गेल्या बुधवारी झालेल्या चकमकीच्या वेळी पकडला गेला होता. त्याने काही लोकांना ओलिस ठेवले होते. त्यांनीही त्याला पकडण्यात मदत केली होती.
नावेद व त्याचा साथीदार महंमद नोमन ऊर्फ मोमीन या दोघांना उधमपूरला आणणारा ट्रकचालक व त्या दोघांना पाच लाख रुपये देणारा व्यापारी व त्यांना दहशतवादी कृत्यांच्या सूचना देणारी आणखी एक व्यक्ती अजून सापडलेली नाही. नावेदच्या जाबजबाबात त्याने ज्यांची नावे घेतली होती, त्यापैकी अकरा जणांना ताब्यात घेण्यात आले. नावेदला लष्कर ए तोयबाच्या दोन पथकांकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याने जाबजबाब घेणाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबरोबर काम करणाऱ्या इतर अतिरेक्यांना पळ काढण्याची संधी मिळावी असा त्यामागचा हेतू होता. या हल्ल्यासाठी दोघांव्यतिरिक्त इतरही काही जण आले होते.