20 October 2019

News Flash

कोईम्बतूरमधील तपासानंतरच श्रीलंकेला सावधगिरीचा इशारा

श्रीलंकेवरील संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबतची माहिती श्रीलंकेच्या गुप्तचर विभागाला देण्यात आली होती,

| April 25, 2019 02:35 am

स्फोटांतील मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘एनआयए’कडून आयसिसच्या प्रचारफिती जप्त

नवी दिल्ली : दक्षिण भारतातील प्रमुख नेत्यांची हत्या घडविण्यासाठी ‘आयसिस’च्या कार्यप्रणालीवर आधारित कट रचण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) श्रीलंकेतही दहशतवादी हल्ले होऊ शकतात अशी माहिती मिळाली होती. तपास पूर्ण केल्यानंतर या महिन्याच्या आरंभीच श्रीलंकेवरील संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबतची माहिती श्रीलंकेच्या गुप्तचर विभागाला देण्यात आली होती, असे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोईम्बतूरमधील या आयसिस प्रकरणाचा सखोल तपास एनआयएने पूर्ण केल्यानंतर दूतावासाच्या माध्यमातून श्रीलंकेला ही माहिती देण्यात आली होती. कोईम्बतूरप्रकरणी एनआयएने सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या तपासादरम्यान नॅशनल तौहिद जमातचा नेता जहरन हाशिम याची ध्वनिचित्रफीत पाहिल्यानंतर कोलंबोतील भारतीय दूतावासावर हल्ल्याचा कट असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर आयसिसशी संबंधित आणखी काही सायबर खात्यांचा तपास केला असता, श्रीलंकेतील चर्च हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकतात, असा इशारा भारतीय अधिकाऱ्यांनी श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांना दिला होता. एनआयएने कोईम्बतूूरमधून ताब्यात घेतलेल्या ध्वनिचित्रफितीमध्ये हाशिम हा श्रीलंका, तमिळनाडू आणि केरळमधील युवकांना या भागात इस्लामी राजवट स्थापित करण्याचे आवाहन करताना दिसतो आहे.

हल्ल्याची पूर्वसूचना मिळाल्याची श्रीलंकेच्या पंतप्रधानांची कबुली

कोलंबो : श्रीलंकेतील हल्ल्याच्या आधीच गुप्तचरांनी भारतीय उच्चायुक्तालयासह अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले होणार असल्याची माहिती दिली होती, अशी कबुली पंतप्रधान रणिल विक्रमसिंगे यांनी दिली आहे.  वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले, की सुरक्षा संस्थांमध्ये आता वरिष्ठ पातळीवर बदल करण्यात येणार आहेत. या हल्ल्यांच्या तपासात प्रगती झाली असून संशयितांची ओळख पटली आहे. यातील काही आत्मघाती हल्लखोर परदेशात जाऊन नंतर श्रीलंकेत परत आलेले होते. न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथे मशिदींवर जे हल्ले झाले होते त्याचा बदला घेण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अनेक देशांनी श्रीलंकेला सहकार्य देऊ केले आहे. त्यात, संयुक्त राष्ट्रे व इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संघटनांचाही समावेश आहे.  संरक्षण सचिव हेमासिरी फर्नाडो यांनी सांगितले, की अमेरिकेच्या एफबीआय या संस्थेने श्रीलंकेतील हल्ल्यांचा तपास सुरू केला असून इंटरपोलचे पथकही श्रीलंकेत येणार आहे. आताच्या हल्ल्यांनी देशाच्या पर्यटनाबरोबरच अर्थव्यवस्थेलाही फटका बसला आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली आहे.

हल्ल्यात महिलेसह नऊ आत्मघाती हल्लेखोर सामील

कोलंबो : श्रीलंकेत रविवारी ईस्टर सणाच्यावेळी चर्च व पंचतारांकित हॉटेलांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात ९ आत्मघाती हल्लेखोर सामील होते, त्यात एका महिलेचा समावेश होता, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने बुधवारी दिली. आत्मघाती हल्लेखोर हे स्थानिक इस्लामी  दहशतवादी गटाचे असून त्यांनी श्रीलंकेत चर्च व हॉटेलांमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट केले.

संरक्षण राज्यमंत्री रूवान विजेवर्धना यांनी सांगितले, की नॅशनल तौहिद जमात या फुटीर इस्लामी गटाने हे हल्ले केले असून उपलब्ध माहितीनुसार या गटात मतभेद होते व मूळ गटातून फुटून बाहेर पडलेल्यांनी हे हल्ले केले. दरम्यान आयसिसनेही या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पण त्यांनी या हल्ल्यात सहभागाचे पुरावे दिलेले नाहीत. विजेवर्धना यांनी सांगितले, की फुटीर गटाचे परदेशी संबंध असल्याचे सध्या तरी कोणतेही पुरावे नाहीत. नऊ आत्मघाती हल्लेखोरांपैकी आठ जणांची ओळख गुन्हे अन्वेषण विभागाने पटवली असल्याचे पोलिस प्रवक्ते रूवान गुणशेकरा यांनी सांगितले. नऊ हल्लेखोरांमध्ये एका दहशतवाद्याची पत्नीही आत्मघाती हल्लेखोर म्हणून सामील होती. आतापर्यंत या हल्ल्यात मारल्या गेलेल्या भारतीयांची संख्या दहा झाली आहे. एकूण ६० जणांना अटक करण्यात आली असून ३२ जणांना सीआयडी कोठडी दिली आहे. अटक केलेले सर्व जण श्रीलंकेचे नागरिक आहेत. एकूण ३४ परदेशी नागरिक यात मारले गेले असून १४ परदेशी नागरिकांची ओळख पटलेली नाही. तसेच १६परदेशी नागरिक या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोलंबो नॅशनल हॉस्पिटल व इतर ठिकाणी उपचार सुरू आहेत. रविवारी चौथ्या हॉटेलवरील हल्ला हाणून पाडण्यात आला असून अजून दहशतवादी व स्फोटके असण्याची शक्यता आहे. अजून संशयित असल्याचे सांगण्यात आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

श्रीलंकेचे संरक्षण सचिव, पोलीस प्रमुख यांना राजीनाम्याचे आदेश

कोलंबो : श्रीलंकेतील भीषण आत्मघातकी स्फोटांबाबत गुप्तचरांकडून पूर्वसूचना मिळूनही हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल देशाचे संरक्षण सचिव हेमरिसी फर्नाडो आणि पोलीस प्रमुख पुजित जयसुंदरा यांनी राजीनामे द्यावेत, असे श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांनी त्यांना सांगितले असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी बुधवारी दिले.

देशाच्या सुरक्षाविषयक आस्थापनांच्या उच्चस्तरीय पदांवर आपण येत्या २४ तासांत बदल करू, असे रविवारी ईस्टरच्या दिवशी झालेल्या स्फोटानंतर पहिल्यांदाच देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सिरिसेना यांनी मंगळवारी रात्री सांगितले होते.

त्यानुसार, आपल्या पदांचा राजीनामा देण्याची विनंती अध्यक्ष सिरिसेना यांनी पोलीस महानिरीक्षक जयसुंदरा आणि संरक्षण सचिव फर्नाडो यांना केली असल्याचे वृत्त अध्यक्षांच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने ‘संडे टाइम्स’ने दिले.

शेजारच्या मित्रराष्ट्राकडून गुप्त माहितीची मदत उपलब्ध असतानाही उच्चपदस्थ सुरक्षा अधिकाऱ्यांनी कार्यवाही का केली नाही असा प्रश्न लोक विचारत असल्याचे सिरिसेना यांनी काल रात्रीच्या भाषणात म्हटले होते. लष्कराचे माजी कमांडर दया रत्नायके यांचा संरक्षण सचिव पदासाठी विचार होत असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

साखळी स्फोटांत मृत्यू पावलेल्यांची संख्या ३५९

कोलंबो : श्रीलंकेत रविवारी ईस्टरवेळी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत मरण पावलेल्यांची संख्या ३५९ झाली असून पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी तपास मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत साठ जणांना या हल्ल्यांप्रकरणात अटक करण्यात आली आहे,असे पोलिस प्रवक्ते रूवान गुणसेकरा यांनी सांगितले. मृतांची संख्या ३५९ झाली असून पाचशेहून अधिक लोक जखमी आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. संरक्षण मंत्री रूवान विजेवर्धने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले,की सुरक्षा व्यवस्थेत मोठय़ा उणिवा राहिल्या आहेत हे सरकारला मान्य आहे. आम्हाला त्याची जबाबदारी घ्यावीच लागेल. अध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना हे सुरक्षा आस्थापनांमध्ये बदल करणार आहेत. ख्राइस्टचर्च हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेत हल्ला होणार असल्याची माहिती गुप्तचरांनी दिली होती. यातील एक आत्मघाती हल्लेखोर हा परदेशात शिकलेला असून त्यांच्यापैकी अनेक जण चांगले शिकलेले, मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय आहेत. ते आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र असून त्यांच्या कुटुंबांना कुठल्याही आर्थिक विवंचना नव्हत्या, त्यामुळे आर्थिक प्रलोभनातून त्यांनी हे कृत्य केले असे म्हणता येणार नाही. एक आत्मघाती हल्लखोर हा ब्रिटनमध्ये शिकलेला होता.

First Published on April 25, 2019 2:35 am

Web Title: nia had information that terrorist attacks could occur in sri lanka