राष्ट्रीय तपास संस्थेला धक्का; दहशतवादी हल्ल्याचा प्रकार असल्याचा संशय
पठाणकोट हल्ल्याच्या तपासकामात सक्रिय सहभाग असलेल्या मोहम्मद तंझील अहमद या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्याची अज्ञात हल्लेखोरांनी तब्बल २४ गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. शनिवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास बिजनौर जिल्ह्य़ात ही घटना घडली. अहमद यांची हत्या हा दहशतवादी हल्ल्याचाच प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या हल्ल्यामुळे एनआयएला जबर धक्का बसला आहे.
विवाहसोहळ्यानिमित्ताने अहमद बिजनौर जिल्ह्य़ातील साहसपूर या गावी सहकुटुंब गेले होते. विवाहसोहळा आटोपून शनिवारी रात्री उशिरा घराकडे परतत असताना अहमद यांची व्ॉगन आर ही गाडी दोन मोटारसायकलस्वारांनी अडवली. अहमद यांनी गाडी थांबवताच या दोन्ही हल्लेखोरांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात अहमद यांची पत्नी फरझाना जबर जखमी झाल्या तर मागील सीटवर बसलेली दोन्ही मुले बचावली. स्थानिकांनी अहमद व त्यांच्या पत्नीला बिजनौरच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, अहमद यांना मृत घोषित करण्यात आले तर फरझाना यांची प्रकृती चिंताजनक
आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर बिजनौर जिल्ह्य़ाच्या सीमा सील करण्यात आल्या असून हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करू असा विश्वास उत्तर प्रदेशचे पोलीस अतिरिक्त पोलीस महासंचालक दलजीत चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही या घटनेची दखल घेत एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. अहमद यांच्यावरील हल्ला हा दहशतवादाचाच प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत
आहे.

आमच्या एका अत्यंत साहसी आणि निष्ठावान सहकाऱ्याची निर्घृण हत्या झाली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आम्ही दोषींना जेरबंद करू.
– संजीव कुमार, एनआयएचे महानिरीक्षक

कोण होते अहमद?
* २००९ पासून एनआयएमध्ये कार्यरत. तत्पूर्वी सीमा सुरक्षा दलाचे साहाय्यक कमांडंट
* एनआयएमध्ये सुरुवातीला गुप्तवार्ता खात्यात निरीक्षक पदावर काम
* त्यानंतर त्यांची नियुक्ती अन्वेषण विभागात झाली. पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याच्या तपासातही अहमद यांचा सहभाग होता
* अत्यंत निष्ठावान आणि कर्तव्यकठोर अधिकारी अशी त्यांची एनआयएमध्ये ख्याती होती