पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात १० ते १५ किलो आरडीएक्स वापरण्यात आल्याची शक्यता आहे. प्राथमिक तपासातून ही माहिती समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे. पुलवामामध्ये गुरुवारी दुपारी सीआरपीएफच्या बसवर स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही कार आदळवून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले.

हल्ला झालेल्या घटनास्थळी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सीएफएसएलच्या स्वतंत्र पथकांकडून तपास सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गावर पंपोर ते अवंतिपोरामधील १५ किलोमीटरच्या पट्टयातच सुरक्षा दलांना वारंवार का लक्ष्य केले जातेय त्याचा सुद्धा दोन्ही यंत्रणांकडून शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. हल्ला झाला त्या लीथपोरा भागाची दोन टीम्सनी पाहणी केली.

श्रीनगरपासून ३० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. तपास यंत्रणांनी फोटो, व्हिडिओ तसेच न्यायवैद्यक तपासणीसाठी नमुने देखील गोळा केले आहेत. एनआयएच्या पथकाने सीआरपीएफच्या ताफ्यातील जवानांशी चर्चा करुन नेमकं त्यावेळी काय घडलं ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. हल्ल्याच्याआधी आणि नंतर या भागातून झालेल्या संशयास्पद कॉल्सचा सुद्धा एनआयए तपास करणार आहे.

या महामार्गावरील पंपोर ते अवंतिपोरा या १५ किलोमीटरच्या पट्टयात लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांची तैनाती असूनही याआधी सुद्धा सुरक्षा दलांवर अनेक हल्ले झाले आहेत. २५ जून २०१६ रोजी याच पट्टयात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यातील बस अडवून अंदाधुंद गोळीबार केला होता. यात आठ जवान शहीद झाले होते आणि २० पेक्षा जास्त जखमी झाले होते. याच पट्ट्यात सीआरपीएच्या बसवर झालेल्या हल्ल्यात ११ जण जखमी झाले होते. २०१४ साली दहशतवाद्यांनी याच पट्टयात बीएसएफच्या जवानांवर गोळीबार केला होता. यात दहापेक्षा जास्त जवान जखमी झाले होते. याच पट्ट्यात सुरक्षा दलांवर का हल्ले होत आहेत ते शोधून काढण्याचे लक्ष्य एनआयएसमोर आहे.