श्रीलंकेत ‘इस्टर डे’ च्या दिवशी घडलेल्या बॅाम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने बुधवारी तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे विविध ठिकाणी छापेमारी केली. प्राप्त माहितीनुसार चार संशयीतांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या अगोदर केरळमध्ये ‘आयएसआयएस’च्या दहशतावाद्यांचा शोध घेण्यात आला होता. ‘एनआयए’ने जिथे इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचा संबंध असू शकतो अशा सात ठिकाणी सकाळपासून दुपारपर्यंत छापेमारी केली.

एनआयएने मारलेल्या छाप्यात १४ मोबाईल, २९ सीम कार्ड, १० पेनड्राइव्ह, ३ लॅपटॅाप, ४ हार्डडिस्क, ६ मेमरी कार्ड, ४ डिस्क ड्राइव्हर आणि १३ सीडी, डीव्हीडी, ३०० एअर गन पॅलेटसह गुन्हगारी कागदपत्र,पीएफआय, एसडीएमआय पत्रक जप्त करण्यात आली आहेत.

श्रीलंकेतील साखळी बॅाम्ब स्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतावादी संघटनेने घेतली आहे. ज्यामध्ये २५० जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय श्रीलंका सरकारने दावा केल आहे की येथील स्थानिक दहशतवादी संघटना नॅशनल तोहेथ जमात (एनटीजे) ने ‘आयएस’च्या पाठींब्यावरच हे स्फोट घडवले आहेत. एनआयएच्या माहितीनुसार आयएसआयएस मॅाड्युलशी निगडीत लोकांचा श्रीलंकेतील स्फोटांशी संबंध असू शकतो. फेसबुकद्वारे दहशतवादी श्रीलंकेतील स्फोटांचा सुत्रधार असलेल्या जहरान हासिम याच्याशी संपर्कात होते.

या घटनेनंतर श्रीलंका सरकारकडून भारताला मदत मागण्यात आली होती. यानंतर पंतप्रधान मोदींनी दोन दिवसीय श्रीलंका दौरा केला तेव्हा ते म्हणाले की, हा दहशतावादी हल्ला येथील लोकांचे मनोबल तोडू शकत नाही. या भ्याड दहशतावादी हल्ल्याचा भारत तीव्र निषेध करतो. शिवाय श्रीलंका सरकारला हवी ती मदत भारत सरकारकडून केली जाईल.