26 February 2021

News Flash

केरळमधील सोनं तस्करीत दाऊदचा सहभाग असल्याची शंका, एनआयएची कोर्टात माहिती

सोन्याच्या तस्करीतून मिळणारा पैसा भारतविरोधी तसंच दहशतवादी कारवायांसाठी वापरल्याची शक्यता

दाऊद इब्राहिम. (संग्रहित छायाचित्र)

केरळमधील सोने तस्करी प्रकरणात मोस्ट वॉण्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा सहभाग असल्याची शंका राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) व्यक्त केली आहे. एनआयएने कोचीमधील विशेष कोर्टात ही माहिती दिली आहे. सोन्याच्या तस्करीतून मिळणारा पैसा भारतविरोधी तसंच दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती एनआयएने दिली असून सोने तस्करीतील आरोपींच्या जामीनाला विरोध केला. एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

काही आरोपींचे दाऊद इब्राहिमशी संबंध असून यानिमित्ताने अनेकदा टंझानियाचा दौरा त्यांनी केला होता अशी माहिती एनआयएने कोर्टाला दिली आहे. दाऊदचा टंझानियात हिऱ्यांचा व्यवसाय असून फिरोज नावाची व्यक्ती सर्व व्यवहार पाहत असल्याचा गुप्तचर यंत्रणांचा रिपोर्ट असल्याचंही एनआयएने सांगितलं.

जुलै महिन्यात वेगवेगळ्या माध्यमातून जवळपास ३० किलो सोन्याची तस्करी करण्यात आली आहे. थिरुअनंतपुरम विमानतळावरुन हे सोनं जप्त करण्यात आलं. हे सोनं संयुक्त अरब अमिरातीमधील दुतावासात पाठवलं जात होतं. कोणत्या माध्यमातून सोन्याची तस्करी करण्यात आली याचा तपास करायचा असल्याने आरोपींना कोठडीत ठेवणं गरजेचं असल्याचा युक्तिवाद एनआयएकडून करण्यात आला. एनआयएकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक असणाऱ्या रमीज याने चौकशीदरम्यान आपला टंझानियामध्ये हिऱ्यांचा व्यवयास असून तेथून सोनं आणलं होतं आणि युएईमध्ये विकलं असा दावा केला आहे.

आरोपींनी तस्करी प्रकरणी बेकायदेशीर उपक्रम प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) कारवाई करण्याला विरोध केला असून हे आर्थिक गुन्ह्यात येत असून दहशतवादाचा याच्याशी काही संबंध नसल्याचा दावा केला आहे. एनआयएने हा दावा फेटाळत काही आरोपींची देशविरोधी संघटनांशी संबंध असल्याचं सांगितलं आहे. एनआयएने कोर्टात माहिती दिली की, आरोपी क्रमांक ५ के टी रमीस आणि आरोपी क्रमांक १३ एम शरफुद्दीन अनेकदा टंझानियाला गेले असून दाऊदचा व्यवहार पाहणाऱ्या फिरोजला भेटले आहेत. यावेळी त्यांच्यात शस्त्रांची तस्करी देशात कशी केली जाऊ शकते यासंबंधी चर्चाही झाली.

एनआयएने आरोपींचा जामीनाला विरोध करताना सर्व आरोपींची चौकशी करण्यासाठी किमान १८० दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवलं जावं अशी विनंती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 11:13 am

Web Title: nia says dawood ibrahim link suspected in kerala gold smuggling case sgy 87
Next Stories
1 मृत समजून मोठ्या भावाला ठेवलं फ्रीझरमध्ये, पण दुसऱ्या दिवशी घडलं भलतंच…
2 दोन वेळच्या अन्नाची भ्रांत, गरिबीला कंटाळून आईनेच घेतला सहा वर्षाच्या चिमुरडीचा जीव
3 देशात चोवीस तासांत ६८० करोनाबाधितांचा मृत्यू, नव्या ६७,७०८ रुग्णांची नोंद
Just Now!
X