आयसिस मॉड्यूलचा भंडाफोड झाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुन्हा एकदा छापेमारी सुरू केली आहे. पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील सात ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. एनआयएच्या पथकाने उत्तर प्रदेशमधील अमरोहा आणि हापूडसह अन्य ठिकाणांवर छापे टाकले आहेत. हापूड येथे दोन संशयित युवकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात येते.

२६ डिसेंबरला एनआयएने आयसिस मॉड्यूल ‘हरकत उल हर्ब ए इस्लाम’चा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी उत्तर प्रदेश आणि नवी दिल्लीतील १६ ठिकाणांवर छापे टाकले होते. त्याचबरोबर १० जणांना अटकही केली होती. यातील ५ जण अमरोहा जिल्ह्यातील रहिवासी होते. या खुलाशानंतर एनआयएचे पथक लखनौ येथेही पोहोचले होते. येथूनही एका मायलेकाला अटक करण्यात आली होती.

‘हरकत उल हर्ब ए इस्लाम’ मॉड्यूल उजेडात आल्यानंतर ताब्यात घेतलेल्या संशयितांनी चौकशीत अनेकांची नावे घेतली आहेत. त्यानंतर एनआयएने एकापाठोपाठ एक छापे टाकण्यास सुरूवात केली आहे. मेरठमधील एका गावात एनआयएने आतापर्यंत ६ वेळा छापे मारले आहेत.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी एनआयएने हापूड येथील पिपलेंडा गावात राहणाऱ्या ताहीर नावाच्या व्यक्तीच्या घरावर छापा मारला होता. यादरम्यान शहजादला ताब्यात घेण्यात आले. एनआयएच्या पथकाने शहजादकडून काही महत्वपूर्ण दस्ताऐवज, पुस्तके आणि चिप जप्त केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहजादने दिलेल्या माहितीवरून एनआयएने छापे टाकण्यास सुरूवात केली आहे.