22 July 2018

News Flash

मसूद अझरवर आरोपपत्र दाखल करण्यास गृहमंत्रालयाची मंजूरी

राष्ट्रीय तपास संस्था लवकरच दाखल करणार आरोपपत्र

मसूद अझर

पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा म्होरक्या मसूद अझरसह त्याच्या तीन साथिदारांवर ओरोपपत्र दाखल करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेला गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. पठाणकोटमध्ये जानेवारीमध्ये हवाईतळावर करण्यात आलेल्या हल्ल्यात सात भारतीय जवान शहीद झाले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) लवकरच पठाणकोट हवाई हल्ल्याप्रकरणी मसूद अझरसह तिघांवर आरोपपत्र दाखल करणार आहेत. पंजाबमधील पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यात भारतीय जवानांना मारण्याचा आणि या ठिकाणी असणारी हत्यारे उधवस्त करण्याचा कट रचल्याचा आरोप मसूदवर ठेवण्यात येणार आहे. अझर मसूदसह त्याचा भाऊ अब्दुल रौफ, आणि अन्य दोन दहशतवाद्यांवर याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल.

पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याची सूत्रे मसूद अझर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ अझर यांच्यासह आणखी दोघांकडून हलविण्यात आल्याचे  तपासात निष्पन्न झाले होते. १९९९मधील ‘इंडियन एअरलाइन्स’च्या आयसी-८१४ विमानाच्या अपहरणाचा सूत्रधार देखील रौफ हाच होता. या चौघांचा तपशील यापूर्वी पाकिस्तानला देऊन त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी भारताने केली होती.

पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यानंतर मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये ठराव मांडला होता. मात्र चीनने अझरला काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावावर नकाराधिकाराचा वापर करुन अभय दिले होते. त्यामुळे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्यासाठी भारताला पुन्हा एकदा प्रयत्न करुन संयुक्त राष्ट्रावर दबाव आणता येईल. पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातील पुरावे राष्ट्रीय तपास संस्थेने गृहमंत्रालयाला सूपूर्द केले होते. सादर केलेल्या पुराव्यातून पठाणकोट हल्ल्यामध्ये अझर मसूदचा हात होता हे स्पष्ट होत असल्यामुळे गृहमंत्रालयाने मसूदवर आरोपपत्र दाखल करण्यास मंजूरी दिली. राष्ट्रीय तपास संस्थेने गृहमंत्रालयात सादर केलेल्या पुराव्यामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी त्यांच्या परिवाराशी केलेल्या संवादाची ध्वनीफित तसेच त्यांच्या घराचे पत्ते यांचा समावेश आहे.

First Published on November 28, 2016 8:16 pm

Web Title: nia set to prosecute jem chief masood azhar for pathankot attack